पान:रससूत्र (Rasasutra).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्धन नाहीत हे स्पष्ट होते. हे अभिव्यक्तिवादाचे खंडन उदा. प्रो.नोली ह्यांनी नैयाकरणचे

खण्डन गृहीत धरले आहे, मी ते साख्यांचे खण्डन समजतो. कारण सांख्य विभावादी सामग्रीमुळे स्थायीभाव प्रेक्षकाच्या मनात उत्पन्न होतात, असे मानत व त्याच्या दर्शनानुमार ही उत्पत्ती म्हणजे सुप्ताची अभिव्यक्ती आहे.

 अभिव्यक्तिवादावर परंपरेने एक आक्षेप चालत आलेला आहे. एक तर रस क्रमाक्रमाने अभिव्यक्त होत आहे असे म्हणावे म्हणजे 'थोडा रस', 'जास्ती रस' अशी रसाची मोजदाद करावी लागेल. दुसरे म्हणजे रस संपूर्णपणे एकदाच अभिव्यक्त होतो असे म्हटले तर मग प्रयोगारंभ झाला की रस व्यक्त होतो असे म्हणावे लागेल. व पुढचा भाग व्यर्थ होईल्, वैय्याकरणाच्या स्फोटावर मीमांसक असेच आक्षेप घेत कारण स्फोटाची अभिव्यक्ती मानली जाई. पण ह्यांपेक्षा दुसरा आक्षेप महत्त्वाचा आहे. अभिव्यक्ती ही उत्पत्तीच आहे व भाक्ना जर खरोखर उत्पन्न झाल्या तर अर्जन प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे शकुंतलेच्या संदर्भात दुष्यंताला रती उत्पन्न होताच दुष्यंत शकुंतला मिळविण्याचा प्रयत्न करणार. त्यासह प्रेक्षकांच्याही ठिकाणी रती निर्माण झाली, तर प्रेक्षकही शकुंतला मिळविण्याचा प्रयत्न करणार. हा अनवस्था प्रसंग आहे. नाट्यात असे घडत नाही. म्हणून तिथे 'भाव-उत्पत्ती' नाही. 'अभिव्यक्ती'नाही. हेच अभिव्यक्तिवाद खण्डन आनंदवर्ध्ननच्या भूमिकेचे नव्हे. पण आनंदवर्धन तर भट्टनायकांचे प्रधान प्रतिपक्षी, मग आनंद वर्धनाचे खण्डन कुटे गृहीत धरावे? माझे ह्या प्रश्नाचे उत्तर वर आलेले आहे. ते खण्डन स्वगत प्रतीतीत ग्रुहित आहे. नाटयास्वादात स्वगतप्रतीती सुद्धा नाही. मग स्वगत उत्पत्ती अगर अभिव्यक्ती कुठून असेल? मग तिथे परगत प्रतीती तरी आहे का? परगत प्रतीती म्हणजे इतरांना अमुक भावना जाणवत आहेत असा बोध होणे. समोरचा माणूस रागावला आहे असे आपणांस कळते ही परगत प्रतीती आहे. अशी प्रतीती बोध करून देणारी असली तरी तिथे प्रेक्षक तटस्थ असतो, आपणांसमोर एखादे प्रियकर प्रेयसीचे जोडपे प्रेमकीडा करू लागले तर आपल्याला लाज वाटेल. मत्सर वाटेल. सर्वांच्या समोर अशा क्रीडा करणा-यांच्या विषयी घृणाही वाटेल. पण रस प्रतीती येणार नाही. स्मृती, बोधासारखी असल्यामुळे तिच्यासारखा रसप्रत्यय असणार नाही. अनुभव स्वगत प्रतीतीच्या पोटात आला.
 भट्टनायक म्हणतो ह्यामुळे रस हा स्वगत, परगतप्रतीती, स्मृती, अनुभव, उत्पत्ती, अभिव्यक्ती, ह्यांच्यापेक्षा निराळा ठरतो. मम्मटकृत स्पष्टीकरण असेच आहे. भट्टनायकाचा हा सगळा विचार निजत्व- जाणिवेसह असणारा आहे. जर निजत्व बुद्धीच्या अवस्थेत विचार केला तर रसाचा अनुभव या कोणत्याही प्रकारच्या अनुभवाशी मिळता-जुळता दिसत नाही आणि म्हणून रसाचा विचार करताना निजत्वासह विचार करता येत नाही. असे त्याचे म्हणणे हे तो रस प्रतीत नाही, उत्पन्न होत नाही, अभि-


८१