पान:रससूत्र (Rasasutra).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भट्टनायकाचे म्हणणे असे की रस प्रतीतही होत नाही. उत्पन्नही होत नाही. त्यांची अभिव्यक्तीही होत नाही. ह्या मतावर अभिनवगुप्तांनी पुढे टीका केलेली आहे. म्हणून त्याचे म्हणणे नेमकेपणाने समजून घेतले पाहिजे. भट्टनायक म्हणतो, रस-प्रतीती आपण कशी समजून घ्यावयाची? ही स्वगत अशी मानली तर प्रेक्षकांना करुण रस प्रसंगी दुःख नसून आनंद असेल तर करुणरसाने आनंद का होतो, व दुःखस्वरूप आस्वाद असेल, तर प्रेक्षक पुनः पुन्हा तिकडे आकर्षिले का जातात ह्या चर्चला आरंभ झालेला आहे. भट्टनायकाने उपस्थित केलेला हा स्वगत प्रतीतीचा मुद्दा म्हणजे लोल्लट शंकुक यांचे खंडन आहे. माझे वैयक्तिक मत असे आहे की येथे आनंदवर्धनाचेही खंडन आहे- मागच्या सर्व काव्यविचाराचे खंडन ह्या एका मुद्दयात आहे. शंकुक ज्यावेळी अवगम मानतो, त्यावेळी प्रकृतीच्या भावना प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत ह्या व्यवहाराने पोचत असतात. म्हणजे रामाचा शोक अभिनयामुळे प्रेक्षकांना उपलब्ध होत असतो. लोल्लटाच्या विवेचनात तादात्म्यामुळे स्वगत प्रतीती होते. आनंदवर्धनात ध्वनिव्यापारामुळे प्रकृतीचे भाव व्यंजित होतात. असा सगळा मागचा प्रमुख काव्य विचार स्वगत प्रतीती मानणारा आहे. भट्टनायकाचे म्हणणे हे.की करुण रसाचे आकर्षण स्वगत प्रतीतीचे खंडन करते.
 शिवाय स्वगत-प्रतीती म्हणताना इतर व्यक्तींचे काय? रामाला शोक होतो सीतेच्या वियोगामुळे. प्रेक्षकांची सीता हा विभाव नव्हे. म्हणजेच प्रेक्षक स्वतःला राम समजत नाही. बरे सीतेचे साधारणीकरण होते व त्यामुळे स्वतःच्या पत्नीचे स्मरण होते असे म्हणणेही योग्य नव्हे. कारण सीता ही देवी आहे. देवतांना साधारण समजणे, अयोग्य आहे. शिवाय नाट्यात समुद्र उल्लंघनासारखे असाधारण प्रसंग असतात. ते आपल्या आटोक्याबाहेरचेच आहेत. म्हणून त्यांचे साधारणीकरण मानणे योग्य नाही. हया आपत्तीचा विचार करताना असे मानावे लागते, की रस ही स्वगत प्रतीती नाही.
 भट्टनायकाने स्वगत प्रतीतीपेक्षा अभिव्यक्ती आणि उत्पत्ती हया कल्पना निराळ्या ठेवलेल्या आहेत. स्वतःच्या जीवनात आपल्या स्वतःच्या हानीमुळे शोक उत्पन्न होतो. लौकिक जीवनात भावनांची जी उत्पत्ती आहे ती निराळी आणि भावना उत्पन्न न होता त्यांची जी सहानुभावाने प्रतीती येते ती निराळी. कुणीही महत्त्वाचा विचारवंत प्रेक्षकांच्या ठिकाणी भावोत्पत्ती मानत नाही. जो उत्पत्ती पक्ष जगन्नाथाने नोंदविला आहे, तो सुद्धा स्वतःला दुष्यंत समजल्यानंतर तसे समजणाऱ्या प्रेक्षकांच्या ठिकाणी जाणिवेच्या दोषामुळे भावोत्पत्ती होते असे मानतो. स्वगत प्रतीतीवर जे आक्षेप आहेत तेच उत्पत्ती पक्षावर लागू होतात. उलट उत्पत्तीच्या भूमिकेत सारे नाट्य हेच भावोक्तीचे कारण मानावे लागते. अभिव्यक्ती पक्षही उत्पत्ती पक्षच आहे. ज्या पद्धतीने भट्टनायक अभिव्यक्तिवादाचे खंडन करीत आहेत, ते पाहता ह्या ठिकाणी त्याच्यासमोर आनंद-


८०