पान:रससूत्र (Rasasutra).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रहील. वरवर पाहिले तर असे दिसून येईल की सांख्यकारिकाकार, नाटयास्वादातील प्रेक्षकांचा प्रत्यय मोक्षाच्या प्रत्ययासारखा समजत आहेत. पण हे खरे नाही. प्रकृतीचे हेतू सांख्य कारिकेप्रमाणे दोन आहेत. पुरुषाचा भोग व मोक्ष (कारिका ५६ ते ५८) पैकी मोक्षावस्थेत पुरुषाला दुःखही नाही, आनंदही नाही. अलौकिक आनंद जरी पुरुषाला झाला तरी तो बद्धतेचा अनुभव आहे. अलौकिक प्रतीतीवादी सांख्य फार तर नाट्य हा सत्वप्रधान भोग बद्ध पुरुषाला, असे नाटयप्रत्ययाचे रूप सांगतील. इथे त्यांना थांबणे भाग आहे. उरलेला सगळा गौडपाद, वाचस्पतिमिश्र यांचा वेदान्त आहे. सांख्याच्या या परंपरेला अनुसरूनच भोजाने रसविचार करताना 'अहंस्वीकृती' असणारा बंधनविशिष्ट आत्मा रस होतो असे प्रतिपादन केलेले आहे. सांख्यांच्या ह्या भूमिकेने वेदांतावर नेमका कसा व कोणता प्रभाव टाकला असेल हे आज निश्चितपणे सांगता येत नाही. सांख्यांच्या भूमिका अशा रीतीने स्वतंत्रपणे उपलब्ध होत असल्यामुळे भट्टनायकाला सांख्य मानता येत नाही.

 भट्ट-नायकाचा उल्लेख करताना अभिनवगुप्त त्याला मीमांसकाग्रणी, जैमिनीचा अनुयायी अशी विशेषणे लावतात. त्याने जो भावकत्त्व व्यापार मानलेला आहे, त्यालाही पूर्वमीमांसेत आधार आहे. ह्यामुळे काहीजण भट्टनायकाला पूर्वमीमांसक मानतात. हे मानावयाला प्रमुख अडचण एकच आहे; ती म्हणजे पूर्वमीमांसकाचा आत्मा आनंदमय नाही. भट्टनायकाच्या काव्यविवेचनासाठी आत्मा, आनंदस्वरूप असणे आणि निजत्व निरासाने आत्मानंद प्रकट होणे ही बाब मूलभूत महत्त्वाची आहे. या दोन्ही कल्पना पूर्वमीमांसेच्या कक्षेत सामावणाऱ्या नाहीत. मीमांसक जो भावनाव्यापार मानतात तोही कर्माला प्रवृत्त करणारा असतो. भट्टनायक नाट्यप्रतीतीने स्वरूप विश्रांती मानतो. ती पूर्वमीमांसेत बसविणे कठीणच आहे. शिवाय अभिनवभारतीच्या पहिल्या अध्यायातील, उताऱ्यातील उल्लेखानुसार असे दिसते की भट्ट नायक सर्व प्रपंच असत्य मानत होता. हे पूर्वमीमांसेला जुळणारे नाही. लगेच दुसऱ्या टोकाला जाऊन तो शांकर अद्वैती, समजण्याचीही गरज नाही. आपल्या परंपरेत विविध मतानुयायी आहेत. ज्याअर्थी भट्टनायक आपल्या ग्रंथारंभी शंकराला नमन करतो त्या अर्थी तो शैव आहे हे निश्चित. त्याची आत्मकल्पना उत्तरमीमांसेच्या परंपरेची आहे म्हणून तो स्थूलपणे वेदान्ती परंपरेत येतो हेही निश्चितपणे सांगता येईल. पण वेदान्तात पुन्हा अनेक मते आहेत. ही मते शंकराचार्यांच्या नंतरची नाहीत. ब्रह्मसूत्रकारांनीच औडूलेमी, अश्मरथ्य व काशकृत्स्न्न्न ह्या तीन आचार्याच्या मतमतांतराचा उल्लेख केलेला आहे. उत्तर मीमांसक विचारवंत सांख्यांची परिभाषा ही सर्रास वापरतात. भोग ही कल्पना मीमांसेतही आहे. (ब्रह्मसूत्र २-१-१३) उत्तर मीमांसक गरजेनुसार योग, व्याकरण पूर्वमीमांसा ह्याचाही आधार घेतात. तेव्हा, भट्टनायक पूर्वमीमांसेचा अभ्यासक, पण स्वतः मात्र शैव वेदान्ती असू शकतो.


७९