पान:रससूत्र (Rasasutra).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत असतो. हा अभिव्यक्तिवाद पुढच्या वेदांत्यांचा मार्ग मोकळा करणारा ठरला.
  नाटयप्रत्ययाचा विचार करणारी सांख्यांची हीच एक भूमिका होती, असे समजण्याचे कारण नाही. वाचस्पती मिश्रांनी (इ. स. ८४१) सांख्य तत्त्व कौमुदीत सांख्यांच्या भूमिकेचा जो सहजगत्या उल्लेख केलेला आहे, तो ह्यापेक्षा निराळी भूमिका सांगणारा आहे. वाचस्पती मिश्र जी भूमिका प्रतिपादन करीत आहेत ती सांख्यकारितील भूमिकेशी एकरूप असणारी आहे. पण हया प्रतिपादनात मूळ सांख्य मत किती आणि वाचस्पती मिश्रांचा स्वतःचा वेदान्त किती हे सांगणे सोपे नाही. सहजगत्या आलेल्या विधानात आपणच फार जास्त अर्थ वाचतो आहो का हेही सांगणे कठीण आहे. ईश्वरकृष्णाचा सांख्यकारिका ग्रंथ इ. स. च्या पाचव्या शतकापूर्वीचा आहे. म्हणजे नाट्यशास्त्र संग्रहानंतरचा; पण लोल्लटादी भाष्यकारांपूर्वीचा आहे. इतक्या जुन्या काळी विचारात न घेतलेली भूमिका, उपलब्ध असेल काय, याबाबत शंकेला पुष्कळच जागा आहे. सांख्यकारिकेत ४२ वी कारिका, नटाचा उल्लेख करते. हया कारिकेप्रमाणे प्रकृती नटासारखी आहे. नित्यनैमित्तिक प्रसंगानुसार नानाविध रूपे घेते. हया रूपांचा हेतू, पुरुषाची हेतूपूर्ती हा आहे. गौडपादांनी या ठिकाणी नट कधी राजा होतो, कधी विदूषक होतो असा उल्लेख केलेला आहे. वाचस्पती मिश्र सांगतात, नट आणि नाटकीय व्यक्ती ह्यांचा संबंध सूक्ष्म शरीर व स्थूल शरीरासारखा असतो. हा सरळ नाट्यशास्त्राचा उल्लेख आहे. नाटयशास्त्राने जीव परदेहाचा स्वीकार करतो त्याप्रमाणे नट प्रकृतीचा स्वीकार करतो असे मत दिलेले आहे. म्हणजे नाट्यप्रयोगात नट प्रकृतीच होतो, पण हयात हेतूपूर्ती प्रेक्षकांची असते. प्रेक्षकांसाठी ही क्रिया घडत असते. पुढे ६५ व्या कारिकेत असे म्हटले आहे की पुरुष नाटयाच्या प्रेक्षकासारखा असतो. मूळ कारिकेतील शब्द कोणता आहे यावर येथे मतभेद आहे. गौडपाद स्वस्थ असा पाठ स्वीकारतात. हया पाटानुसार प्रेक्षक नाटयास्वाद प्रसंगी विश्रांतीच्या अवस्थेत असतो. ही विश्रांती आत्मस्थित असते. वाचस्पती मिश्र “ सुस्थ " असा पाठ स्वीकारतात. या पाठानुसार प्राक्तन दौस्थ्याचा निरास झाल्यामुळे प्रेक्षक प्रसन्न असतो असे ठरते. माझ्या समोर सध्या सूर्यनारायण शास्त्रींची प्रत आहे. त्यांनी 'स्वच्छ ' हा पाठ स्वीकारला आहे. कोणताही पाठ घेतला तरी प्रेक्षकांची अवस्था नाटयप्रत्ययात सत्त्वोद्रेकाची आनंदावस्था मानता येते. सांख्य नाटयप्रत्यय लौकिक प्रत्ययापेक्षा भिन्न रज-तम मुक्त सत्त्वातिरेकाचा आनंद प्रत्यय समजत व तेथे प्रेक्षकांना विश्रांती मानत असा हयाचा अर्थ आहे. हयाही भूमिकेला नाटयशास्त्रात आधार आहेच. नाटयशास्त्रात विश्रांतीचा उल्लेख आलेला आहे. (१।११४)
 जे सांख्य विचारवंत नाट्यप्रत्यय लौकिक मानतील त्यांची भूमिका अभिनव भारतीतील सांख्य मतासारखी राहील. जे सांख्य नाट्यप्रत्यय लोकविलक्षण मानतील त्यांची भूमिका कारिका गौडपाद, वाचस्पती मिश्र, ह्यांना मिळती-जुळती सत्त्वोद्रेकाची

७८