पान:रससूत्र (Rasasutra).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या कारणामुळे गोविंद ठक्कुर व पुढारी मंडळी भट्टनायकाला सांख्य म्हणतात. ते कारण फार दुबळे आहे. उलट काव्यानंद ब्रह्मास्वाद सविध म्हणण्यामुळे तो सांख्य नसण्याचा संभव वाढतो. भट्टनायक सांख्य मतानुयायी नव्हे असा निर्णय घेण्याची ही दोन गौण कारणे असतात.
 भट्टनायक सांख्य नसण्याचे प्रमुख कारण असे आहे की अभिनवगुप्तांनी सांख्य मत म्हणून एक निराळेच मत आधी नोंदविलेले आहे. ते भट्टनायकापेक्षा संपूर्णपणे भिन्न मत आहे. हे अभिनव भारतीतील सांख्य मत असे आहे. रस हा सुख दुःख स्वभावरूप आहे. हया सुखदुःखाची बाह्य जनक सामग्री विभावादी ही आहे. या सामुग्री पैकी विभाव तलस्थानीय आहेत. अनभाव आणि व्यभिचारी भाव संस्कारक आहेत. स्थायी भाव हया सामग्रीमुळे जनित असा प्रेक्षकांच्या अंतर्गत आहे. तो सुखदुःख स्वभाव आहे. हया जनित स्थायीला उपचार म्हणून रस म्हणतात. ही भमिका सांख्यांशी मिळती-जुलती आहे असे अभिनव सांगतात. अभिनव भारतीत आलेल्या हया सांख्य मताचे वैशिष्ट्य असे आहे की त्यात भावकत्व, साधारणीकरण इ. भट्टनायकाच्या कल्पनांचे अवशेषही दिसत नाहीत. सांख्यांची ही भमिका स्थायी भावांना रस मानणारी आहे व ह्या मर्यादेत स्थायी भाव रस होतो, ह्या नाट्यशास्त्रातील प्रतिपादनाला सुसंगत आहे. नाट्यशास्त्रात स्थायी, विभावांनी उत्पन्न होतो असे म्हटलेले आहे हथा भमिकेत स्थायी हाच रस असल्यामुळे रसनिष्पत्तिसूत्र हे स्थायी भावांच्या उत्पत्तीचे सूत्र मानलेले आहे. या मांडणीत अनेक सोयी आहेत. पहिली सोय अशी की नाट्यशास्त्र, प्रेक्षक स्थायी भावाचा, आस्वाद घेतात असे सांगते. तो स्थायी हाच रस म्हटल्यामुळे. स्थायीचा आस्वाद, रसांचा आस्वाद, आस्वाद म्हणजेच रस हया सर्व भूमिका एकार्थक होतात. हया आस्वादामुळे प्रेक्षक हर्षादींना प्राप्त होतात हे नाट्यशास्त्रातील मत हा स्थायी सुख दुःखस्वरूप असल्यामुळे सुसंगत होते. दुसरी सोय अशी की रस सूत्रात स्थायीचा उल्लेख का नाही, याचेही उत्तर देता येते. रससूत्रातील घटक ही बाह्य जनक सामग्री आहे. स्थायी हा रसिकांतर्गत व जनित आहे म्हणून रससूत्रात स्थायीचा उल्लेख नाही, असे म्हणता येते. सांख्यांच्या मताप्रमाणे सारे बाहृय जगत ही प्रकृतीची निर्मिती आहे व प्रकृती सत्त्व-राज-तमास्मक म्हणजे, सुखदुःख मोहस्वरूपी आहे. त्यामुळे विभावादी वाहय सामुग्री स्थायी भावाची जनकही मानता येते व स्थायीभाव सुखदुःखरूपही मानता येतो. पैकी अनुभाव आणि व्यभिचारी हे विभावांचेच आहेत तेव्हा विभाव तलस्थानीय आहेत. नुसते विभाव स्थायी जन्माला घालत नाहीत. म्हणून अनुभाव व व्यभिचारी संस्कारकही मानता येतात. म्हणजे या भूमिकेला गरजेपुरता आधार नाटयशास्त्रात मिळू शकतो.
 ज्या नाट्यशास्त्रातील भूमिका हया मताच्या विरुद्ध जातील, त्या उपचार म्हणून सांगता येतात. आपल्या विरुद्ध जाणारी वाक्ये उपचारात घालण्याची सांख्यांची

७६