पान:रससूत्र (Rasasutra).pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंडन करणारा दिसतो आणि भट्टनायक अभिनवगुप्ताच्या पूर्वी होऊन जातो कारण अभिनवगुप्त त्याचे खंडन करतात. या दोन काळांच्यामध्ये होऊन गेलेला लेखक म. म. काणे यांना अभिनवगुप्तांना जास्त जवळ असावा असे वाटते. हया वाटण्याचा आधार घेऊन त्यांनी भट्टनायकाचा काळ इ. स. ९३५ ते इ. स. ९८५ हा ठरविलेला आहे. कांतिचंद्र पांडे ह्यांनी राजतरंगिणीतील उल्लेखाच्या आधारे हा काळ इ. स. ८८३ ते ९०२ दिलेला आहे. केवळ वाटण्यापेक्षा काही आधार बरा म्हणून मला डॉ. पांडे यांचा काळ अधिक ग्राहय वाटतो.
 उत्तरकालीन परंपरा भट्टनायकाला सांख्यमतानुयायी मानते. काव्यप्रकाशनाचे टीकाकार गोविंद ठक्कुर हयांचे हे मत असल्यामुळे ते परंपरेत नंतर सर्वानी प्रमाण मानलेले दिसते. शंकुक नैय्यायिक आहे असे सर्वांचे मत असल्यामुळे त्या आधी व नंतरच्या भूमिकांचे दर्शन निश्चित करण्याची इच्छा निर्माण झालेली दिसते. त्यात भट्टनायकाचे दोन प्रमुख शब्द ठळकपणे समोर येतात. एक तर तो रसाचा भोग मानतो. भोक्तृत्व हा सांख्यांच्या आत्म्याचा खास प्रांत आहे. ते आत्म्याला भोक्ता मानतात. (सांख्यकारिका १७ ) हया आत्म्याच्या म्हणजे पुरुषाच्या भोगासाठीच सर्ग असतो. दुसरा भट्टनायकाचा ठळक शब्द सत्त्वोद्रेक आहे. सत्त्व-रज-तम ही सांख्यांची प्रसिद्ध परिभाषा आहे. हया दोन कारणांमुळे भट्टनायक सांख्य असल्याचा ग्रह झालेला दिसतो, वैदिक षड्दर्शनात दोन न्याय आहेत, दोन सांख्य आहेत, दोन मीमांसा आहेत. अभिनवगुप्तांचा सिद्धान्त पक्ष उत्तर मीमांसेचा म्हटल्यानंतर लोल्लट पूर्व-मीमांसा मतानुयायी ठरणे ओघानेच प्राप्त होते. विचार करण्याच्या ह्या पद्धतीला गोविंद ठक्कुरांच्यापासून आरंभ होतो असे दिसते.
 समोर असलेल्या पुराव्याकडे पाहाता भट्टनायक सांख्यमतानुयायी नव्हे असे मानणे भाग आहे. ह्या निर्णयाची दोन गौण कारणे आहेत. सांख्यदर्शन पुरुषाला म्हणजे आत्म्याला भोग मानते, पण हा भोग संसारभोग असून तो बद्धावस्थेत येतो. मुक्तावस्थेत पुरुषाला भोग नसतो. भट्टनायक काव्यानंद ब्रह्मानंदासारखा मानतो, म्हणजे रसभोगाचे सादृश्य मुक्तावस्थेशी आहे. रसभोगाचे मुक्तावस्थेशी सादृश्य सांख्य मताच्या विरोधी आहे. सांख्याची मुक्तावस्था सुखदुःख अभावरूप आहे. ती आनंदमय नाही. दुसरे गौण कारण असे की, सत्त्व-रज-तम ही सांख्यांची परिभाषा उत्तर मीमांसा व अद्वैत वेदान्त ह्यांच्यात विपुलपणे वापरली जाणारी परिभाषा आहे. वेदान्त परंपरा भगवद्गीतेतील सांख्य विचाराला प्रमाण मानून असे मानते की खरे मूळचे सांख्य. मत वेदान्तीच होते व ते आत्म्याचे प्रभुत्व सांगणारे दर्शन होते. मूळच्या खऱ्या कपिलाचे म्हणणे हेच होते. निरीश्वरवादी सांख्यमत, हे उत्तरकालीन खोटे मत आहे. म्हणून वेदान्त सांख्याची परिभाषा आपलीच समजून वापरतो. हे नसते सत्त्व-रजतमाबाबतच नव्हे तर प्रकृती, पुरुष, सर्ग अशा अनेक कल्पनांच्या बाबतही आहे.

७५