पान:रससूत्र (Rasasutra).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अगदीच स्थूल व असमाधानकारक आहे असे म्हणणे भाग आहे.
 अभिनवगुप्तांनी लोल्लटाला अगदी कमी महत्त्व दिले आहे. शंकुकाच्या लोल्लट-खंडनाला त्या मानाने अधिक महत्त्व देऊन भट्ट तोतकृत शंकुकखंडन विस्ताराने उद्धृत केले आहे. ह्या तोतकृत खंडनात, अभिनवगुप्तांचा एखादा मुद्दा सहजच मिसळून गेलेला असेल. भट्टनायकाचे खंडन मात्र त्यांनी स्वतः केले आहे. कालानुक्रमे पाहता, भट्टनायक, तोतांच्या पूर्वी येतात. भट्ट तोतांनीसुद्धा भट्टनायकाचे खंडन केलेले असेलच, पण त्यापेक्षा स्वतंत्ररीत्या भट्टनायकाचा विचार करणे त्यांना अधिक उचित वाटलेले दिसते. लोचन टीकेतही आनंदवर्धनोत्तर ध्वनि- विरोधकात भट्टनायकाला सर्वात अधिक महत्त्व त्यांनी दिलेले आहे. भट्टनायकाच्या खंडनाला एवढे महत्त्व अभिनवगुप्तांनी का द्यावे हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. तसे पाहिले तर गमानुज आणि निंबार्क ह्यांच्या भूमिका जशा परस्परांशी जास्तीत जास्त मिळत्याजुळत्या आहेत त्याप्रमाणे भट्टनायक व अभिनवगुप्तांच्या भूमिका परस्परांशी जास्तीत जास्त मिळत्या आहेत. त्यामुळे अभिनवगुप्तांच्या भट्टनायक खंडनाला शब्दखंडनाचे स्वरूप आलेले आहे. आशयाचे खंडन करावे. शब्दावर वाद घालू नये हा वेदांताचा शिष्टाचार मानतात. आशय मान्य असताना शब्दांवर वाद निर्माण करणे ह्याला शब्दखंडन म्हणतात.
 संस्कृत काव्यसमीक्षेत भट्टनायक हा एका नव्या दिशेने जात असणारा पहिला विवेचक आहे. भामहापासून आनंदवर्धनापर्यंतचे काव्यविवेचक, नाटयविवेचक, साहित्य व्यवहार व नाट्यप्रयोग ह्यांचा विचार करीत आहेत. कलात्मक अनुभवाचे स्वरूप काय आणि ह्या अनुभवाचे महत्त्व काय हे दोन प्रश्न ह्या विचारवंतांच्या पुढे आहेत. भट्टनायकात ह्या दिशेचा संपूर्णपणे त्याग भट्टनायकाचा निर्णय हा आहे की परमार्थ क्षेत्रातील ब्रह्मानंद आणि काव्यानंद दोन्हीचीही जात एकच आहे. भट्टनायकाचे असेही मत आहे की शांतरम हा मोक्षोपयोगी असल्यामुळे सर्वश्रेष्ठ रस आहे. ह्या निर्णयावर भट्नायक वाङ्मयाच्या, नाटयाच्या, अभ्यासातून येत नाही ब्रह्मानंद आणि काव्यानंद ह्याची जात एकच आहे हा निर्णय धार्मिक तत्त्वज्ञाने देतात. काव्य चर्चेत हा धर्मनिर्णय समर्थित करणे व प्रस्थापित करणे हा भट्टनायकाचा हेतू आहे. धर्माच्या नेतृत्वाखाली काव्यचर्चा आरंभ करणारा ह्या क्षेत्रातील तो पहिला उपलब्ध विचारवंत आहे धर्मप्रधान श्रद्धाळू जीवनात ह्या दियोचा पराभव शक्य नसतो.
 भट्टनायकाच्या ग्रंथाचे नाव 'सहृदयदर्पण' अगर 'हृदयदर्पण' असे होते. आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. म. म. काणे ह्यांचे मत असे आहे की, हा ग्रंथ रमप्रदीपकार प्रभाकराला सोळाव्या शतकात उपलब्ध होता. हे त्यांचे मत जर आपण ग्राह्य मानू शकलो तर भट्टनायकाला काश्मीरबाहेरही दीर्घकाळ अभ्यासक मिळाले असे म्हणता यईल. मला काणे ह्यांचे अनुमान उपलब्ध पुराव्याशी सुसंगत वाटते. पण ह्याबाबत

७३

.