पान:रससूत्र (Rasasutra).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणण्याची गरज नव्हती. किंवा विभावही कृत्रिम मानता आले असते, पण कवीने उत्पन्न केलेले आहेत म्हणून अप्रमित स्थायी कवीचा म्हणता आले असते. पण महिमभट्ट यापैकी काहीही म्हणत नाही.
 शंकुकाची अवगमाची कल्पना आणि महिमभट्टाचे अनुमान हयातही फरक आहे. अलौकिक अनुमान जरी असले तरी ते भाव बोधक असणार. त्यामुळे सीतेला शोक झाला आहे हे ज्ञान होईल. ( ज्ञान होते असेच महिम भट्ट नोंदवितो.) जो शोक सीता भोगते आहे त्या भावनेचा प्रत्यय, भावनेची उपलब्धी व स्वाद प्रेक्षकांना मिळणार नाही. शंकुकाचा अवगत भावबोधक नाही. अवगमामुळे भावप्रतीती आहे. काही अभ्यासक मानतात त्याप्रमाणे महिमभट्ट ही शंकुकाची विकसित सुधारित आवृत्ती नव्हे. शंकुकात असलेल्या मार्मिकपणाचाही महिमभट्टात लोप होतो हे आता स्पष्ट होईल. भट्टनायक ज्या परगत प्रतीतीचा विरोध करतो ती परगत-प्रतीनी महिम भट्टात स्पष्टपणे दिसते. इतर कुणी ही विशिष्ट परगत प्रतीती मान्य केलेली नाही.
 महिमभट्टाने चमत्काराचा मुद्दा स्वीकारलेला आहे. तो म्हणतो लौकिक व्यवहारातही आपणास अनुमानाने ज्ञान होते. इतरांच्या शोकाचा बोध होतो पण हा बोध आनंददायक असत नाही. मग काव्यामुळेच सुखास्वादाचा संभव का असावा? महिमभट्टाचे या प्रश्नाला उत्तर असे आहे की, काव्यातं चमत्कार असतो. लौकिक जीवनात चमत्कार नसतो. दुसरे म्हणजे जे ज्ञान अनुकरणाच्या आधारे, अनुमानाने प्राप्त होते ते चमत्कारी असते हा स्वभाव आहे. (इति स्वभाव एवायं) महिमभट्ट आत्मवादाचा या चमत्काराशी संबंध आणीत नाही म्हणून तो केवलानंदवादी न मानता आल्हादवादी मानला पाहिजे. लौकिकवादी की अलौकिकवादी, हा प्रश्न शंकुकानुसार सोडवला पाहिजे. ही प्रकृतीची विचित्रता आहे. तिच्या बाबत हे असे का उलट प्रश्न विचारता येत नाही. महिमभट्टाच्या या मुद्दयांत कोणताही मार्मिकपणा नाही. तो अभिनव गुप्तोत्तर काव्यशास्त्रज्ञ असल्यामुळे चमत्कार मानतो व आपल्या विवेचनाला, सुसंगत चमत्काराचे स्पष्टीकरण देऊ पाहतो, इतकेच काय ते. योगायोगाने हे महिमभट्टाचनु मत अरिस्टॉटलच्या भूमिकेशी विलक्षण मिळते-जुळते आहे. अरिस्टॉटल सर्व कला व्यवहार अनकरणात्मक मानतो. त्याने काव्यानुभवात अनुमान गृहीत धरले आहे. अनुकरण पाहून वाचक प्रेक्षकांना मूळ वस्तूची ओळख पटते, हेच ते, असे वाटू लागते हा अनुमानाचा भाग आहे. हे अनुमान सुखद असते. अनुमानप्राप्त ज्ञान सुखद का असते ? अरिस्टॉटल सांगतो ज्ञान प्राप्ती स्वभावतःच सुखद असते. शिवाय अनुकरणाची इच्छा व अनुकरण पाहताना आनंद प्राप्त होणे, ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे. अरिस्टॉटलने नोंदविलेली ही मूलभूत प्रेरणा व महिमभट्टाचा स्वभाव, त्यांचे स्वरूप एक सारखेच म्हटले पाहिजे. महिमभट्टाच्या ध्वनिखंडणाची व अनुमानवादाची योग्यता कोणती हा निराळा मुद्दा आहे. पण त्याचे रसविवेचन


७२