पान:रससूत्र (Rasasutra).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



म्हणजेच रस, असे म्हणू शकतो. शंकुकात नसलेला हा मुद्दा महिमभट्टात आहे याचे कारण तो अभिनगुप्तोत्तर लेखक आहे हे मानले पाहिजे. ज्यावेळी तो स्थायी-अनुकरण-रूप रस आहे असे म्हणतो त्यावेळी विभावादी सामग्री स्थायीचे अनुकरण करून स्थायी आस्वाद्य करतात म्हणून तो त्याला रसनेचा विषय ह्या अर्थाने रस म्हणतो. एकच शब्द दोन भिन्न अर्थाने वापरणे सदोपच म्हटले पाहिजे पण ध्वनिकार जर एक ध्वनी शब्द पाच अर्थानी वापरत असतील व परंपरा त्याचे समर्थन करीत करीत असेल तर महिमभट्टाला तरी दोष कोणत्या तोंडाने द्यावा?
 नाटयशास्त्राचा टीकाकार म्हणून शंकुकाचा अनुभाव नटशिक्षणावर, व्यभिचारी भाव नटाच्या कृत्रिम अर्जनशक्तीवर आधारित आहे. जिथे अनुभाव, व्यभिचारी भाव तिथेच विभाव असणार म्हणून शंकुकाच्या विवेचनात रससूत्रातील तीन्ही घटकांचा नटाशी व नाटयप्रयोगाशी संबंध आहे. जर विभाव अनुभाव व्यभिचारी नाटयाचाच भाग असतील, तर मग काव्यात काय आहे, काव्यगत प्रकृतींच्या भाव भावनांचे काय? हा त्या विवेचनात अडचणी आणणारा प्रश्न आहे. महिमभट्टाच्या विवेचनात ही अडचण येत नाही. तो काव्याच्या संदर्भात विचार करीत असल्यामुळे अनुभाव व्यभिचारी भाव ह्यांना त्याच्या विवेचनात काव्यगत प्रकृतीचा आश्रय आहे. विभावही काव्याचा भाग आहेत. शंकुकापेक्षा हे निराळेपण आहे पण त्यामुळे दोन वेगळ्याच आपत्ती, महिमभट्ट स्वीकारताना उपस्थित होतात. पहिली आपत्ती अशी आहे, की काव्यगत विभावादी सामग्री कृत्रिम मानली तर मग तिच्या आधारे ज्या स्थायी भावांचे अनुमान होते तो स्थायी भाव कुणाचा समजायचा? आता काव्याच्या मागे जायचे म्हणजे लौकिक जीवनातील देशकाल विशिष्ट व्यक्तींना अनुकार्य मानावे लागते. भट्ट तोताचे आक्षेप खरोखरी काही प्रमाणात प्रस्तुत ठरत असतील तर महिमभट्टाविरुद्ध ठरतात. महिमभट्टाच्या विवेचनात हेतू कार्य, सहचारी भाव व स्थायीभाव लौकिकात आणि विभाव अनुभाव व्यभिचारी भाव काव्यात अशी विभागणी स्वीकारावी लागते. म्हणजे काव्याद्वारे देशकाल विशिष्ट लौकिक स्थायी अनुमित होती असे मानावे लागते. ही भूमिका कुणालाच स्वीकारार्ह वाटणार नाही शिवाय स्थायी मात्र काव्यात नसतात, पण हेच स्थायीभाव व्यभिचारी असेल तर ते काव्यात असतात, हा विसंवाद पत्करावा लागेल. दुसरी अडचण ही आहे की काव्य हे विशिष्ट लौकिकाचे अनुकरण व नाटयप्रयोग हा ह्या अनुकरणाचे अनुकरण असे गृहीत धरावे लागेल हा एक अनवस्था प्रसंगच आहे. महिमभट्ट, शंकुकाची कल्पना अर्धवट स्वीकारतो व नव्या अडचणी निर्माण करून ठेवतो असा ह्याचा अर्थ आहे. शंकुकाला 'शब्द हे लिंग आहेत आणि काव्यगत प्रकृती त्याचे भाव रस इ.अनुमेय आहे असे म्हणता आले असते. अनुमानवाद न सोडता शंकुकाची साथ पूर्णपणे सोडून देऊन महिमभट्टाला अधिक व्यवस्थितपणे आपली बाजू मांडता आली असती. विभाव कृत्रिम आहेत, असे


७१ .