पान:रससूत्र (Rasasutra).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पद्धत म्हणून त्याला न्यायपरंपरेचा लेखक म्हणावयाचे. एरवी दार्शनिक भूमिकेत तो नैय्यायिक नाही. सर्वच दर्शनकार अनुमान, हे प्रमाण मानतात. महिमभट्टाचा प्रमुख सिद्धान्त असा की शब्दशक्ती फक्त एकच आहे. ती म्हणजे अभिधा. ह्याखेरीज कळणारे सर्व अर्थ म्हणजे लक्षणा व व्यंजना ह्या शक्तींनी कळणारे अर्थ अनुमानाच्या कक्षेत येतात. म्हणून अभिधेखेरीज वेगळ्या शब्दशक्ती मानण्याची गरज नाही. महिमभट्टाने तपशिलाने मांडणी केली नसली तरी हे उघड आहे की तो कुतकांच्या वक्रोक्तिवादाचा व भट्टनायकाच्या भावकत्व व्यापाराचाही विरोधक आहे. ध्वनीच्या ऐवजी अनुमान मानणारा तो एकटाच नाही. श्रीहर्षही ध्वनीचा अंतर्भाव अनुमानात करतो. म्हणून कुणी श्रीहर्षाला नैय्यायिक म्हणणार नाही तोच प्रकार महिमभट्टाचा आहे. त्याची दार्शनिक भूमिका अद्वैती काश्मिरी शैवांचीआहे. प्रो. कांतिचंद्र पांडे ह्यांनी महिमभट्ट काश्मिरी शैव अद्वैती असल्याचा मुद्दा विस्ताराने मांडलेला आहे. महिमभट्टाचे मुख्य प्रतिपाद्य ध्वनिवादाचे खंडन व अनुमानाचे समर्थन हे आहे. तो नाट्यशास्त्राचा टीकाकार नव्हे. नाटयचर्चा हा त्याचा विषय नव्हे. ध्वनिकारांनी रसाचा विचार केला आहे म्हणून महिमभट्ट रस विचाराकंडे वळतो. त्याने रसविचार काव्याच्या संदर्भात केला आहे. रसप्रतीती हा अभिधालक्षणेचा प्रांत नसून व्यंजनेचा प्रांत आहे असे ध्वनिकारांचे मत आहे. स्वाभाविकच महिमभट्ट रस-प्रतीती अनुमानाचा विषय आहे हे सांगतो. जे जे जाणवण्यासाठी व्यंजना व्यापार मानण्याची गरज आहे ते सारे अनुमानाने जाणवते, ह्या मुख्य मुद्दयाचा पोटभाग म्हणून हे रसविवेचन आलेले आहे. रसविवेचन करताना महिमभट्टासमोर,स्वाभाविकपणेच शंकुक उभा आहे. पण शंकुकाचा जरी आधार नसता तरी महिमभट्टाला रस-प्रतीती अनुमानात अंतर्भूत कशी होते हे सांगणे भाग होते. शंकुक समोर असल्यामुळे महिमभट्ट त्याचे अनुसरण करतो. पण त्याच्या व शंकुकाच्या भूमिकेत काही महत्त्वाचे फरकही आहेत.
 रस हाच काव्याचा मुख्य अर्थ आहे. ह्या मुद्दयावर महिमभट्टाचे ध्वनिवाद्यांशी एकमत आहे. मतभेदाचा मुद्दा रसप्रतीती कशी होते हा आहे. शंकुकाला अनुसरून महिमभट्ट हे सांगतो की रस स्थायी-अनुकरण-रूप आहे. त्यालाच अनुसरून तो हेही सांगतो की विभावादिक कृत्रिम आहेत. ते लौकिक जीवनात नाहीत. लक्षणांतर वैय्यर्थ्याचा मुद्दा महिमभट्टानेही उपस्थित केलेला आहे. पण त्याचे उत्तर शंकुकापेक्षा निराळे मानणे भाग आहे. शंकुकाप्रमाणेच स्थायीची प्रतीती महिमभट्ट प्रमुख मानतो. महिमभट्टाच्या विवेचनात रस हा शब्द दोन भिन्न ठिकाणी भिन्न अर्थाने वापरला आहे असे मानणे भाग पडते. ज्यावेळी रस हाच काव्यार्थ आहे असे तो म्हणतो, त्यावेळी, अनुमान प्राप्त स्थायीची प्रतीती, हा काव्याचा मुख्य हेतू आहे, तसेच आस्वादाचे मुख्य फल आहे, असे त्याला म्हणावयाचे असते. ह्या अर्थानं तो आस्वाद


७०