पान:रससूत्र (Rasasutra).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामाशी सदृश असेल. अगर नसेल पण ते माझ्या कल्पनेतील रामाचे , चित्र असते. ह्या पद्धतीने विचार करताना काव्य नाटकात मनश्चक्शूने दर्शन घेणारा कवी महत्त्वाचा होतो. व क्रमाने " अनुकरण" ही कल्पना मागे पडू लागते. पुढे विकसित झालेल्या अलौकिक व्यवहार हया कल्पनेचा हा आरंभ आहे. रंगात भाव नसताना पण ते प्रेक्षकांना भाव प्रतीत करून देऊ शकतात. हा विचार शब्दांच्या संदर्भात आरंभ झाला, की तो ध्वनी विचारांचा आरंभ असतो.
  हा चित्र-तुरग न्याय अनेक प्रकारे मांडता येतो. विभाववादींच्या संयोगाने व्यक्त होणारा स्थायीभाव प्रकृतीचा आहे. तोच रस आहे असेही म्हणता येईल. विभावादींच्या संयोगाने व्यक्त होणारा स्थायी भाव खरे म्हणजे नटाचा असतो. पण प्रकृतीचा भासतो..असेही म्हणता येईल. ही साधनसामग्री जड असल्यामुळे जो भाव व्यक्त होतो तो खरे म्हणजे प्रेक्षकांचा भाव असतो. पण प्रकृतींचा भासतोः असेही म्हणता येईल. हे सारे भाव प्रथम कवीचे नंतर प्रेक्षकांचे असतात. पण दोघांनाही ते प्रकृतीचे वाटतात असेही म्हणता येईल. आणि हा अनुभव अलौकिक असल्यामुळे यांपैकी कोणत्याही मताचे लौकिक पुराव्याने खंडन करता येणार नाही. असा आग्रहही धरता येईल.
 अभिनव भारतीत ह्या चित्रं-तुरग-न्याय वाद्यांचे जे खंडन आलेले आहे तेही त्रोटक आहे. जेव्हा अश्वाचे चित्र आपण काढतो, तेव्हा खरा घोडा निर्माणच होत नाही. अश्वसदृश आकृती निर्माण होते. म्हणून ही खऱ्या अश्वाची निर्मिती नव्हे. ही नुसती प्रतिमा आहे. हा खंडनाचा एक मुद्दा असून चित्र-तुरग-न्याय काव्याला लागू करता येत नाही. कारण घोडा व त्याचे चित्र दोन्ही जड आहेत. काव्यातील भाव अजड आहेत हा खंडनाचा दुसरा मुद्दा आहे. हे दोन्ही मुद्दे चित्र-तुरग न्यायाच्या चर्चेत अप्रस्तुत आहेत. कारण चित्रातील घोडा हा स्वारीला, उपयोगी, चणे खाणारा तबेल्यात बांधण्याजोगा खरा घोडा आहे. असे त्या मताचे समर्थकही मानणार नाहीत. रंग रेषांच्यापेक्षा काहीही खरे नसून, घोड्याची प्रतीती येते हा त्यांचा मुद्दा आहे. येथे अनुकरण मानण्याची गरज नाही. घोडा जड आहे. काव्यातील घोडा काल्पनिक रंग व काल्पनिक प्रमाणात असू शकतो. ते कोणाही विशिष्टाचे अनुकरण मानण्याची गरज नाही. घोडा जड आहे. काव्यातील भाव अजड असतात. हाही मुद्दा अप्रस्तुत आहे. कारण चित्र वस्तुदर्शकच असेल असे नाही. भाव. दर्शकही असेल. अभिनव भारतीतील हया ठिकाणचा काही भाग लुप्त झालेलाही असू शकेल.
  हया चित्र-तुरग न्यायवाद्यांच्या खंडनात अभिनवगुप्तांना फारसा रस नाही. त्यांनी रस घेण्याचे कारणही नाही. एक स्वतंत्र भूमिका म्हणून हया भूमिकेचं महत्व कोणतेही असो ती भरतसंमत भूमिका असू शकत नाही. कारण हया न्यायात रंगच विभाव अनुभाव, व्यभिचारी होतात. रंगच हया तीन घटकांचा संयोगही होतात.


६८