पान:रससूत्र (Rasasutra).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वी प्रकृतीच्या ठिकाणी भाव उत्पत्ती मानावी लागते. म्हणजे विवेचन भावाकडून रसाकडे जाऊ लागणार. दुसरा कौतुकाचा मुद्दा हा आहे की रस-सूत्रात स्थायीचा उल्लेख का नसावा ? हयाचे त्याने पहिले मार्मिक स्पष्टीकरण केले. आता हा मार्मिकपणा बाजूला ठेवून, नवा प्रश्न विचारावा लागेल. की जर स्थायी व व्यभिचारी प्रकृतिगत आहेत आणि त्यांचे प्रयोगात फक्त अनुकरण आहे तर स्थायीसह व्यभिचारीचा अनुल्लेख का नाही? आणि ज्याचे अनुकरण करायचे त्या सर्वोचा रससूत्रात उल्लेख असेल तर मग ह्या सूत्रात स्थायीचा उल्लेख का नाही ?

 जर व्यभिचारी भाव फक्त नटगत मानले तर प्रकृतीच्या जवळ अनुभाव, व्यभिचारीभाव, राहात नाहीत. अशा प्रकारे विचार करणे हास्यास्पद आहे. जर प्रकृतीच्या जवळ स्थायीसंचारी सात्त्विक असे सर्व भाव मानले तर शंकुकाची मीमांसा कोसळते. अशी ही अडचण आहे. एक तर शंकुकाच्या मांडणीत सुधारणा करून त्याचा लोल्लट करावा, नसता ती भूमिका जशीच्या तशी ठेवावी व नाना विसंवादांनी भरलेली म्हणावी अशी आपत्ती आहे. नाट्यशास्त्रातील सर्व स्थायीभावाचे रूप असे आहे की ते संदर्भानुसार व्यभिचारी होतात. उदा. वीर रसाचा स्थायीभाव, उत्साह, रौद्र रसात, व्यभिचारीभाव होतो. स्थायीभाव हे प्रसंगपरत्वे व्यभिचारी होत असल्यामुळे शंकुकाच्या विवेचनात असे म्हणावे लागते की ज्यावेळी जुगुप्सा, उत्साह हे व्यभिचारी भाव असतात त्यावेळी नट कृत्रिम असणाऱ्या निजानुभावाच्या बळावर त्यांचे अनुसंधान करू शकतो. मनात भावोत्पत्ती नसताना कृत्रिम अनुभावाने व्यभिचारीची सिद्धी होते. पण ज्यावेळी जुगुप्सा, उत्साह इत्यादी स्थायीभाव, त्यावेळी मात्र अशा प्रकारे स्थायीची सिद्धी होऊ शकत नाही. हया भूमिकेत विसंगती आहे. एक तर साऱ्याच भावांची सिद्धी, कृत्रिम अनुभावांच्या आधारे होते असे म्हटले पाहिजे. जर व्यभिचारी भाव हे अनुभावाच्या आधारे प्रदर्शित व्हायचे असतील, तर खरे म्हणजे कृत्रिम विभाव आणि कृत्रिम अनुभाव हया खेरीज नाटयानुकरणात कशालाच जागा असणार नाही. मग रससूत्रात व्यभिचारी भावाचा निराळा उल्लेख असण्याची गरज काय सांगणार? आणि जर विभाव, अनुभाव व्यभिचारींनी स्थायीचे अनुकरण करणे आपण शक्य मानले तर नवीन आपत्ती येते. शिक्षाबलाने सिद्ध होणारे अनुभाव हेच व्यभिचारीची सिद्धी करतात. म्हणून काव्यबल व अभिनय इतक्यानेच स्थायीचे अनुसंधान होऊ लागते. स्थायीभाव काव्यबलाने अनुसंधेय आहेत असे मानणे, शंकुकाला टाळता येणार नाही. हा भाव स्थायी का आणि तो व्यभिचारी का याचे उत्तर शंकुक कोणते देत असणार? जो पुष्ट होतो तो स्थायी हे उत्तर शंकुक देऊ शकत नाही. ज्याला पार्षद प्रसिद्धी तो स्थायी हे उत्तर देणार का? मग तत्त्वतः स्थायी-संचारीत भेद उरत नाही. भेद तत्त्वाचा न राहाता प्रथा परंपरांचा राहातो.


६४