पान:रससूत्र (Rasasutra).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



म्हणजे राम हा आश्रय, सीता आलंबन विभावे आणि स्वयंवर समेचे वातावरण, हा उद्दीपन विभाव म्हणावे लागते. नाट्यशास्त्रात विभाव स्थायी भाव निर्माण करतात. असे जे म्हटले आहे तो उपचार आहे. प्रकृतीच्या ठिकाणी विभाव नाहीत पण स्थायी भाव आहेत. प्रयोगात विभाव आहेत पण स्थायी भाव नाही. अनुभाव स्थायीशी सलंग्न आहेत, असे नाट्यशास्त्रात म्हटले आहे. तोही उपचार आहे. कारण अनुभाव फक्त नटाच्या ठिकाणी असतात असे स्पष्टीकरण आपण करू शकतो, नाही असे नाही. पण त्याचा अर्थ नाट्यशास्त्रातील " नाटयरस" हा एक शब्द सोडला तर बाकीचा सगळा विवेचनाचा व्याप फक्त उपचार आहे. वेगळ्या भाषेत हे सांगायचे तर असे म्हणावे लागते की नाट्यशास्त्राचा शंकुकाला पाठिंबा नाही. जे शंकुकाला, इतरांच्या मानाने भरत अभिप्रायाच्या अधिक जवळ मानतात त्यांच्याशी सहमत होणे मला कठीण आहे.
 भाव कल्पनेच्या संदर्भातील अडचणींचा हा आरंभ आहे. नाटय शास्त्रात एकूण ४९ भावांचे वर्णन आलेले आहे. ह्यांपैकी आठ सात्त्विक भाव आहेत. शंकुकाच्या विवेचनात सात्त्विक भावांचे स्थान कोणते? सात्त्विक भाव अनुभावात समाविष्ट असोत, त्यांचा संबंध नटांशी व नाट्यप्रयोगाशी आहे. मूळ पायाशी नाही. म्हणजे मुख्य रामाच्या जवळ, फक्त रती राहिली. ह्या मुख्य प्रकृतीला सीतेवर प्रेम करता येईल, पण तिच्या भेटीने उल्हसित होता येणार नाही. तिच्यासाठी हुरहुरता येणार नाही. व्यभिचारी भाव फक्त नाटय प्रयोगाचा भाग असून नटासाठी आहेत. ह्या भूमिकेचा अर्थ हा असा आहे. जर आपण व्यभिचारी भाव मूळ प्रकृतीच्या जवळ आहेत व नाट्यप्रयोगात फक्त त्यांचे अनुकरण आहे, असे म्हटले, तर एकीकडे स्थायी संचारी सात्त्विक असे सर्व भाव प्रकृतिगत मानून, प्रयोगात त्यांचे अनुकरण मानावे लागते. म्हणजे लोल्लटाच्या भूमिकेवर यावे लागते आणि त्यासहच दुसरीकडे प्रेक्षकांना अवगम होताना केवळ स्थायीचा नव्हे तर भावसमूहांचा अवगम होतो, असे मानावे लागते. जर स्थायी संचारी सात्त्विक असे सर्वच भाव प्रकृतिगत असतील तर मग ह्या भावांशी परस्परांशी संबंध काय हा प्रश्न उभा राहतो. ह्या प्रश्नाचे उत्तर देताना आपण लोल्लटाच्या अधिक जवळ जातो. व्यभिचारी भाव प्रकृतिगत आहेत हे मान्य केल्या नंतर ज्या मुद्दयावर शंकुकाचे सर्वांनी कौतुक केले, त्या दोन मुद्दयांचे काय होणार?
 पहिला कौतुकाचा मुद्दा हा आहे की, नाटय शास्त्रातील विवेचन भावातून रसाकडे जात नसून रसातून भावाकडे जात आहे. इकडे शंकुकाने प्रथम लक्ष वेधले. आता प्रकृती गतस्थायी, संचारी, ही कल्पना मान्य केल्यानंतर विभाव-अनुभाव संचारी व स्थायी ह्यांचा प्रथम संयोग प्रकृतीच्या संदर्भात होतो. मग रस हे नाटयरस न राहाता प्रथमतः काव्य रस होतात, व नाटकात वापरले जात असल्यामुळे नाटयरस होतात. हे लोल्लटाचे मत आहे. रस ही प्रथम प्रकृतिगत होतो व नंतर प्रयोगगत होतो. रसाच्या


६३