पान:रससूत्र (Rasasutra).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 नाट्यात रस असतो. काव्य नाटयाप्रमाणेच अनुभव प्रत्यक्षायमान करते, म्हणून काव्यातही रस असतो, ही भूमिका शंकुकाला घेणे भाग आहे. नाही तर त्याला काव्यात रस नसतो असे म्हणावे लागेल. नाटक, काव्य समोर असताना हे कुणीच भरताचा टीकाकार म्हणू शकणार नाही. काव्यात नट नसतो. शब्दच असतात. शब्दांनीच विभावाचे अनुसंधान तेथे होते. शंकुकाला हे मान्यच' आहे. पण काव्यात शिक्षाबलाने सिद्ध होणारे अनुभाव नाहीत. कृत्रिम असे व्यभिचारी सगळेच येथे काव्य बलाने सिद्ध होणार. स्थायी हाच रस असेल, तर तोही काव्यबलाने येणार फार तर शंकुक असे म्हणू शकेल की काव्यातील रस शब्दांच्या वाचकत्वामुळे अभिधाराशक्ती मुळे निर्माण होत नाही. रसाचा अवगम शब्दांच्या अभिनयामुळे होतो. पण हे म्हटले तरी स्थायीभाव काव्यबलानुसंधेय ठरला. आणि काव्यात नाटयाप्रमाणे अनुकरणसामुग्री नाही. काव्यातील विभाव कृत्रिम म्हणण्यास जागा नाही. म्हणून रस अनुकरण रूप मानण्यात अडचणी निर्माण झाल्या.
 शंकुकाची भूमिका नाट्यशास्त्राची भूमिकाही नाही, ती लोल्लटापेक्षा मार्मिक भूमिकाही नाही. आहे ती भूमिका फारशी रेखीव व आत्मसुसंगतही नाही असे हया विवेचनावरून पटण्यास हरकत नसावी. तरीही तो पुढच्या काव्यशास्त्रावर सर्वात मोठा प्रभाव टाकणारा लेखक ठरला. न्यायाने जी विवेचन पद्धती स्वीकारली होती तिच्यातील दोन पायऱ्या हुकल्याचा हा परिणाम आहे. शंकुकाने प्रेक्षकांपासून आरंभ केला. प्रेक्षकांना भावाचा आस्वाद प्राप्त होतो हे ठिकाण वादातीत आहे. हा भावाचा आस्वाद प्रयोग पाहाताना प्राप्त होतो इथेही वाद असू शकत नाही. या प्रयोगात नट आणि त्याचे कृत्रिम अभिनय आहेत. यावरही कुणी फार वाद करू शकणार नाही. अशा टप्प्याटप्प्याने शंकुकाचा विचार सावधपणे पुढे सरकत असतो. असा तर्कशुद्ध विचार करताना आपणास बीज ग्रंथात किती आधार आहे याची चिंता न करण्याची नैय्यायिकांची पद्धत आहे. शंकुक हथा परंपरेचा असूनही त्याला नाट्य शास्त्रात इतका विपुल आधार सापडतो हा एक योगायोग आहे. हा विचार करताना प्रथम शंकुक हे विसरतो की, प्रेक्षकांना नट, नट म्हणून आस्वाद्य नसतो. राम म्हणून आस्वाद्य असतो. प्रेक्षक जेव्हा नटाला आस्वादक्षणी राम रूपाने स्वीकारतात तेव्हाच आस्वाद शक्य होतो. म्हणून विभागाचे स्वरुप रामरूपाने स्वीकारलेला नट हे असते. म्हणजे रामच विभाव असतो. नाट्य प्रयोगात विभाव अनुभावाचे अनुकरण असते. त्यामुळे स्थायी व्यभिचारांचे ग्रहण होते. स्थायीचे अनुकरण नाटयात हया अर्थाने असते की स्थायीचे ग्रहण होईल. हया प्रकारे अनुभावांचे अनुकरण असते म्हणून दुस-यांदा शंकुक हे विसरतो की, रस अनुकरण रूप नसतो. अनुकरणाद्वारे गम्य असतो. हया दोन पायऱ्या विसरल्यानंतर तो पुन्हा अलौकिक प्रत्ययाजवळ येतो. नटालाही आपले रामरूपाचे ग्रहण व्हावे म्हणून रामाशी जास्तीत जास्त समरस व्हावे


६५ .