पान:रससूत्र (Rasasutra).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रश्न असा निर्माण होतो की आता अनुभाव नटाचे ठरले. शंकुक, भट्टतोत अप्रभाण नटाचेच मानतात. पैकी सीतेचे काम करणारी नटी शोकाचा अभिनय करते. हा अभिनय म्हणजेच अनुभावही आहे. मग सीता ह्या प्रकृतीविषयी काय म्हणायचे ? शंकुकाचे उदाहरण रत्नावलीतील आहे. उदयनराजा हा नायक आहे. नायकाच्या शरीरावर स्वेदाचा उगम आहे. (चित्रातील उदयनाच्या अंगावर अश्रु पडलेले आहेत. ते पाहून उदयनाला स्वेद हा सात्विक भाव जाणवू लागतो.) जर अनुभाव म्हणजेच अभिनय हे नटाच्या ठिकाणी मानले तर मग नायक-नायिकाच्या ठिकाणी काय मानावे? सीतेच्या गालावरून ओघळणारे अश्र अनुभाव असले तर अनुकरण करणा‌-या नटीच्या गालावरून ओघळणारे अश्र अभिनव ठरतात. एकदा अनुभाव नटाच्या ठिकाणी मानले की, अभिनयाच्या द्वारे अनुकरण करण्यासाठी मागे काहीच राहत नाही. लौकिकातील ऐतिहासिक रामाचे अनुकरण काव्यातील प्रकृती करते. लौकिकातील कारणे काव्यगत प्रकृतीच्या संदर्भात विभाव होतात. नाटयात विभावाचे अनुकरण आहे ही लोल्लटाची भूमिका नाटयात अनुकरण आहे हे शंकुक मान्यच करतो. कृत्रिम विभाग जर नाट्य प्रयोगाचा भाग मानले तर विभाव हा अनुकरणाचा भाग होतो. मग नटाने अनुकरण कुणाचे करावयाचे? हे अनुकरण ऐतिहासिक राम ह्या व्यक्तीचे म्हटले म्हणजे नाटक काव्याचे अस्तित्वच संपले. आणि हे अनुकरण काव्यगत प्रकृतीचे म्हटले तर मग ह्या काव्यगत प्रकृतीला काय म्हणावे? काव्यगत प्रकृती, काव्यातील वातावरण, प्रकृतीचे भाव, अनुभाव ह्याच्यासाठी नाटयविचारात जागाच राहत नाही. कारण आता विभाव अनुभाव संचारी हे प्रयोगातील अनुकरणाचे भाग झालेले आहेत. जे जे विवेचक अनुभाव आणि अभिनय ह्यात गल्लत करतील त्या साऱ्यांना हा विसंवाद स्वीकारणे भाग असते.
 शंकुकाच्या विवेचनातील दुसरी महत्त्वाची अडचण भाव ह्या कल्पनेच्या संदर्भात आहे. तो स्थायी भावांचे नाटयात अनुकरण असते असे मानतो. हे स्थायी भाव मुख्य रामदिगत म्हणजे अनुकार्यगत, प्रकृतिगत आहेत. पण नाट्यशास्त्रात प्रत्येक स्थायी भावाचे वर्णन करताना स्थायीभाव विभावानी उत्पन केला जातो, असे म्हटलेले आहे. शंकुकाच्या विवेचनात विभाव हे नाटयप्रयोगातच आहेत. म्हणून एक तर नाटय प्रयोगात विभावांनी उत्पन्न केलेला स्थायी भाव असतो हे मान्य करावे लागेल. मग विभाव हे लिंग राहणार नाहीत, ते कारण होतील. आणि भावाचे कारण असणारे विभाव कृत्रिम म्हणता येणार नाहीत. नाहीतर कृत्रिम विभाव हे खन्या विभावांचे अनुकरण, कृत्रिम अनुभाव म्हणजे अभिनय हे खऱ्या अनुभावाचे अनुकरण; या लोल्लटाच्या मार्गाने जावे लागेल. तिसरा पर्याय नाटयातील विभाव हे प्रेक्शकांच्या स्थायीची उत्पत्ती करतात, असे मानण्याचा आहे. पण हे मानल्यानंतर अनुकरण व अवगम ह्या दोन्ही कल्पना सोडून द्याव्या लागतील. स्थायीभाव प्रकृतींचा असे म्हटले


६२