पान:रससूत्र (Rasasutra).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि विडंबब एवढाच अर्थ अनुकरणाचा असेल, तर नाटकात प्रख्यात वस्तूंचे अनुकरण नसते असेही म्हणता येईल अभिनवगुप्ताच्या ह्या विधानात दोन लक्षणीय बाबी आहेत. त्यांचाही येथे उल्लेख करणे प्राप्त आहे. जड वस्तूचे अनुकरण शक्य आहे असे तोत व अभिनवगुप्त मानतात. अशा सर्व ठिकाणी लोखंडी तलवारीचे अनुकरण लाकडी तलवारीने झाले तर विनोद व हास्य निर्माण होते. असे अभिनवगुप्तांना म्हणायचे आहे काय ? त्यांना तसे म्हणायचे नाही. भावानुकरण दास्योत्पादक आहे म्हणण्यापूर्वी भावानुकरण शक्य आहे असे म्हणावे लागते. तोतांच्या विरुद्ध भावानुकरण शक्य आहे असे अभिनवगुप्तांना म्हणायचे आहे का? त्यांना तसेही म्हणायचे नाही. अभिनवगुप्तांना असे काहीही न म्हणता आपल्या विरोधकांची भुमिका हास्यास्पद ठरवायची असते, इतकाच हयाचा अर्थ आहे.
 भट्ट तोतांच्या खंडनाचा निरोप घेऊन आपण पुन्हा शंकुकाकडे वळू. शंकुकाच्या विचारांचा प्रभाव व त्याच्या मतांना जागजागी नाटयशास्त्रात असणारा पाठिंबा पाहिल्यानंतर दोन प्रश्न शिल्लक राहातात. पहिला प्रश्न असा की शंकुकाची भूमिका नाटयशास्त्रातील गृहीत भूमिका आहे का? दुसरा प्रश्न असा की, शंकुक नैय्यायिक असल्यामुळे त्याची भूमिका लोल्लटापेक्षा जास्त सुसंगत व रेखीव असावी अशी अपेक्षा असते ती पूर्ण होते का?
 शंकुकाच्या भूमिकेला, विरोधी जाणारे नाटयशास्त्रातील प्रमुख स्थळ 'अनुभावांचा अभिनय' ही कल्पना आहे. ठिकठिकाणी नाट्यशास्त्रात अनुभावाचा अभिनय करावा असे म्हटलेले आहे. ह्यांपैकी अभिनय नाटय प्रयोगात नटाच्या ठिकाणी आहेत. नाटयशास्त्रात आचार्यानी अभिनय शिकवायचे आहेत. प्रयोगात आहार्य अभिनय आहे. शंकुकाच्या स्वतःच्या मताप्रमाणे नाट्यात अभिनय असतो. हृया अभिनयामुळेच स्थायीभावाचा अवगम शक्य होतो. आता नटाच्या ठिकाणी अभिनय आहेत. ते शिक्षणाने उत्पन्न होणारे आहेत असे म्हटल्यानंतर अनुभाव कुणाचे हा प्रश्न शिल्लक राहातो. या प्रश्नाचे उत्तर देण्याचे अनेक मार्ग आहेत. पैकी पहिला मार्ग अनुभाव आणि अभिनय, एकच आहेत असे म्हणण्याचा आहे. अनुभाव म्हणजेच अभिनय, नाटयशास्त्रात अनुभवाचा अभिनय करावा असे म्हटले आहे, तो व्यवहार असून अनुभावप्रदर्शन करावे हया वाक्याचा अर्थ व अभिनय करावा हया वाक्याचा अर्थ एकच आहे. या पद्धतीने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. शंकुकाने सर्वप्रथम अनुभाव आणि अभिनय हयात गल्लत केलेली दिसते. शंकुकाच्या प्रभावामुळे पुढे सर्वांनी ह्या मुद्दयावर गल्लत केलेली आहे. हया गल्लत करण्यामुळे जो विसंवाद निर्माण होतो तो संस्कृत काव्यशास्त्रातील कायम विसंवाद आहे अभिनवगुप्तांच्या मीमांसेतही हा विसंवाद आहेच.
 ज्याक्षणी आपण अनुभाव व अभिनय ह्या शब्दांचा अर्थ एकच समजतो त्याक्षणी


६१