पान:रससूत्र (Rasasutra).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सादृश्य, इतकेच अनुकरणात गृहीत आहे हे समजतो, हयावर अवलंबून आहे.' लोल्लट, शंकुक जे अनुकरण मानतात ते संकेताधिष्ठित अनुकरण आहे. एवढी सगळी चर्चा करून तोत अनुकार्याच्या अनुभावाचे अनुकरण नटांना शक्य आहे हयाला नकळत मान्यता देऊन जातात.,br>  तोतांचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, मूळ राम ही व्यक्ती अपरिचित आहे. जे अपरिचित आहे त्याचे अनुकरण कसे करणार ? हया आक्षेपात अनुकार्य हया कल्पनेबाबतचा चतुर घोटाळा आहे. ज्यावेळी लोल्लट-शंकुकाचा विचार चालू असेल त्यावेळी अनुकार्य नेहमी ऐतिहासिक व्यक्ती समजून असा प्रश्न उभा करायचा की, मूळचा राम अनुकरण करण्यासाठी परिचित कुठे आहे, हा प्रश्न उभा करताना लोल्लट शंकुकासमोर प्रकरण-भागातील काल्पनिक पात्रे व प्रख्यात कथांतील ही काल्पनिक पात्रे आहेत, हे सोईस्करपणे विसरून जायचे, व स्वतःचा विचार मांडताना मात्र नेहमी काव्यगत प्रकृती, कविनिर्मित नायक, हे अनुकार्य समजावयाचे. एक प्रश्न विचारून आपण भट्ट तोतांचा निरोप घेऊ. चित्तवृत्ती अजड असल्यामुळे त्याचे अनुकरण शक्य नाही. नाटयात तर विभाव कृत्रिम असल्यामुळे भाव नाहीत. मग जो भावप्रत्यय येतो ते भाव आहेत कुणाचे? एक तर हे भाव अनुमेय म्हटले पाहिजेत, अगर नटाचे रसिकाचे किंवा कवीचे. तोत व्याभिचारीभाव कवीचे अगर रसिकाचे मानतील का? तोतांचेच असे मत लोचनात आहे की, कवी, नायक व रसिक यांचे अनुभव समान असतात. नटांना फक्त काव्यातील प्रकृतींचे अनुकरण करणेच शक्य असते. हया प्रकृती अपरिचित नसतात, परिचित असतात. काव्यगत प्रकृतींचा दृढ परिचय झाल्याविना नटांना अभिनयच करता येणार नाही. म्हणून तोतांच्या हया आक्षेपातही फारसा अर्थ नाही. तोतांचे हे अनुकरणवादाचे खंडन परंपरेत अतिशय प्रतिष्ठित झाले हे खरे आहे, पण हया प्रतिष्ठेचे कारण त्यांच्या युक्तिवादाचे सामर्थ्य नसून, समाजातील वाढती अंधश्रद्धा दिसते.
 तोताच्या मते नाटयात अनुकरण नसते, तर अनुव्यवसाय असतो. पुढच्या बहतेक समीक्षकांनी त्याचे हे मत प्रमाण मानलेले आहे. हया ठिकाणी अनुव्यवसाय, अनुकीर्तन, अनुकृती असे जे शब्द वापरले जातील ते सगळे अनुकरणापेक्षा नाटयाचे वेगळेपण सांगणारे समजावयाचे व अनुव्यवसायाचा अर्थ, ती कथा पुन्हा एकदा सांगणे असा करावयाचा, म्हणजे जे नाटयात प्रसिद्ध कथेचे अनुकरण नसते. तीच कथा पुनः एकदा सांगितलेली असते. कवींच्या बाबत पुन्हा एकदा सांगणे, हया शब्दाला काहीतरी अर्थ आहे. नट पुन्हा एकदा सांगतात असे म्हणणे व काव्य प्रकृतीचे अनुकरण करतात असे म्हणणे हयात काही फरक दिसत नाही. अभिनवगुप्त नेहमी असे सांगतात की, अनुकरणाने हास्य निर्माण होते हे म्हणणे जर शब्दशः खरे समजावयाचे असेल, तर अनुकरण हा शब्द विडंबन हया अर्थाचा मानावा लागेल

६०