पान:रससूत्र (Rasasutra).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा भरतमुनींचा अभिप्राय सिद्ध करण्याचा राजमार्ग हा की, नाट्यशास्त्रात वेळोवेळी नाटय हे अनुकरण आहे असे म्हटले आहे. हे अनुकरण लोकवृत्त, कर्म, अवस्था, सुखदु:ख यांचे आहे. नाट्यशास्त्राच्या सिद्धी अध्यायात भावानुकरण, समाही शब्द प्रयोग आहे. (२७-६२) हया मार्गानेच शंकुक जाणार. रस हा अनुकरण रूप नव्हे, हे सिद्ध करण्यासाठी मुनिवचनानुसार रस हा आस्वादाचा विषय नव्हे. तो आस्वादस्वरूप आहे असे सिद्ध करावे लागते. त्या प्रश्नाकडे भट्टतोत वळलेले दिसत नाहीत. तोत स्वतः रस आस्वादरूप मानतात व हा अर्थ, मनात ठेवून रसाला वस्तुवृत्त नसते, असा आक्षेप घेतात. शंकुकावर आक्षेप घेताना शब्द त्याच्या अर्थाने न वापरता आपल्या स्वतःच्या अर्थाने गृहीत धरून आक्षेप घेणे चमत्कारिकच म्हणणे भाग आहे.
  तोतांच्या मते, नटाच्या ठिकाणी हृदय संवाद असतो. नाटय व्यवहारात साधारणीकरण आपण मान्यही जरी केले तरी त्यासाठी काही आश्रय लागतो. रामाचा शोक एका व्यक्तीचा शोक म्हणून प्रतीत न होता साधारण शोक म्हणून प्रतीत होतो. असे आपण गृहीत धरू. पण त्या आधी शोकातला राम हा आश्रय गृहीत धरावा लागतो. वेगळ्या भाषेत सांगायचे तर जे देशकाल-विशिष्ट असते ते विशिष्टाचा निरास झाल्यानंतर साधारण होईल. म्हणून हृदय संवाद मानण्यासाठी काव्यगत प्रकृती मान्य कराव्या लागतात. हया काव्यगत व्यक्तीशी जेव्हा आपण नटाचा हृदय संवाद सांगतो, त्यावेळी ज्या व्यक्ती परिचित नाहीत, पूर्वज्ञात नाहीत, त्यांचे अनुकरण अशक्य आहे असे एकीकडे सांगताना, दुसरीकडे अपरिचित अज्ञात व्यक्तीशी हृदयसंवाद मात्र शक्य आहे, असे सांगावे लागते. नटांना जर प्रकृतीशी हृदय संवाद शक्य असेल तर मग अनुकरणही शक्य मानणे भाग असते. तोतांच्या अनुकरणवाद खंडनाचा एक फार मोठा भाग त्यांनीच स्वीकारलेल्या हृदय संवादाच्या कल्पनेमुळे बाद होतो, हे परंपराप्रेमी अभ्यासक विसरूनच जातात. नटाला स्वतःच्या विभावांचे स्मरण असते, हा मुद्दा तर अधिक अडचणी निर्माण करणारा आहे. स्वविभावस्मरण म्हटले म्हणजे, दोन दोष निर्माण होतात. नटाचे सगळे स्मरण त्याच्या लौकिक जीवनातले असते. हया लौकिक जीवनात विभावाचे अस्तित्व मान्य करावे लागते लौकिक जीवनात विभावांचे अस्तित्व तोतांना मान्य नाही, दुसरे म्हणजे, स्वविभावस्मरणाने नटाच्या ठिकाणी भावोत्पत्ती मान्य करावी लागते हे ही तोतांना मान्य नाही नटाच्या चित्तवृत्तीचे साधारणीकरण होते म्हटल्यावर नटाला रसास्वाद मान्य करावा लागतो हे ही तोतांना मान्य नाही. भट्ट तोतांच्या विवेचनात फारसा मार्मिकपणा नाही हे हयावरून उघड व्हावे.
 अनुकरणवादावर तोतांचे प्रमुख आक्षेप दोन आहेत. एक आक्षेप असा आहे की, जे परिचित नाही, त्याचे अनुकरण शक्य नाही. दुसरा आक्षेप असा की जे जड


५८