पान:रससूत्र (Rasasutra).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. तोतांच्या ह्या खंडनात, जवळपास एकही नवीन मुद्दा नाही. पण हे खंडण अंप्रस्तुत मानता येणार नाही. नट अनुकरण करतो असे शंकुकाचे मत आहे. हे खंडन प्रस्तुत मानले तरी सयुक्तिक आहे का?
 भट्ट तोतांच्या मते नटाचे कार्य काय? त्यांच्या मते नटाचा व्यवहार त्रिविध असतो. एक तर नट व्यवहार शिक्षावशात् म्हणजे अभ्यास व शिक्षणाने बनलेला असतो. दुसरे म्हणजे नटाला स्वतःच्या विभावांचे स्मरण असते. आणि तिसरे म्हणजे नटाच्या ठिकाणी हृदयसंवाद असतो. त्यामुळे चित्तवृत्तीचे साधारणीकरण होते. ह्यांच्या बलावर नट फक्त अनुभवाचे प्रदर्शन करतो. शंकुकानेही अनुभाव शिक्षावशातच मानलेले आहेत. पण तो विभाग आणि व्यभिचारी भाव ह्याचा निराळा उल्लेख करतो. तोत फक्त अनुभाव मानतात. तोतांच्या विवेचनात नटांचा ह्रदय संवाद कुणाशी होतो हे स्पष्ट नाही. प्रो.नोली ह्यांनी हा हृदय संवाद, साधारणी कृतभावाशी मानला आहे. पण ह्या स्पष्टीकरणामुळे संदिग्धता वाढते. तोतांच्या समोर भट्ट नायक आहेत हे जरी आपण गृहीत धरले तरी नट व्यवहारात साधारणीकरण मान्य करणे तोतांच्यासाठी सुसंगत नाही. मॅसन, पटवर्धनांनी हा ह्रदयसंवाद अनुकार्याशी मानला आहे.
 वस्तुवृत्त म्हणूनही रस अनुकरणरूप मानता येत नाही. कारण रस अनुसंवेद्यमान आहे. म्हणजे रस ही प्रतीती संविती व चर्वणा ह्यानंतर येणारी आस्वादस्वरूप प्रतीती आहे. अशा आस्वादरूप प्रतीतीला वस्तुवृत्त नसतेच. म्हणून रस अनुकरणरूप नाही. भरत मुनींनीही स्थायी भावाचे अनुकरण म्हणजे रस असे कुठे म्हटलेले नाही. तसे त्यांनी सुचविलेलेही नाही. उलट नाट्यात लास्य, ताल, ध्रुवा आदी घटकांचा समावेश असतो. हे घटक अनुकरण करणारे नाहीत. मुनि-वचनाचा आधार नाट्य हे अनुकरण आहे. ह्या भूमिकेला फक्त घेता येईल. पण नाटयशास्त्रातील ह्या शब्दांची इतरही स्पष्टीकरणे शक्य आहेत. एकूण काय तर कोणत्याच अर्थाने नाटय हे अनुकरण नाही. रस ही अनुकरणरूप नाही. भट्ट तोतांच्या ह्या खंडनाचे महत्त्व मला ह्यासाठी वाटते की ते अनमितिवादाचे खंडन नसून अनुकरण वादाचे खंडन आहे. अनुकरणाचा मुद्दा मागे अप्रमितीवादाच्या संदर्भात शंकुकाचा विचार व्हावयाला आरंभ अभिनवगुप्तोत्तर काळात मम्मटापासून होतो असे दिसते.
 तोतांच्या हया शंकुक खंडनात सयुक्तिकता किती हे जर आपण पाहू लागलो, तर त्यांच्या सूक्ष्म विवेचनशक्ती विषयी आणि चौरसपणाविषयी फारसे अनुकल मत होत नाही शंकुकाने कधी सामाजिकाला आस्वादक्षणी अनुकरण जाणवते, असे म्हटले नव्हते. म्हणून त्या बाजूच्या खंडनावर भर देण्याची गरज नव्हती. तोतांनी नेमका नको तिथे भर दिला आहे. शंकुकाने कधी अनुकरणरूप स्थायी म्हणजे रस, हया अर्थाचे भरताचे स्पष्ट विधान आहे असे म्हटलेले असणार नाही; कारण तसे नाट्य शास्त्रात विधान नाही. तो म्हणणार ते इतकेच की, असा मुनींचा अभिप्राय आहे.


५७ .