पान:रससूत्र (Rasasutra).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नट खरे म्हणजे रागावलेला नसतो; पण रागावल्यासारखा दिसतो, हे म्हणणे युक्तः आहे. पण ह्याचे कारण अनुभवाचे सादृश्य आहे. आणि रागावल्यानंतर माणूस कसा दिसतो हे पूर्वपरिचित आहे. तसा रामादी व्यक्तींचा परिचय प्रेक्षकांना कुठे असतो? शिवाय प्रेक्षकांना अनुकार्य आणि अनुकर्ते सदृश आहेत असे भान तरी कुठे असते? ह्या उलट, प्रेक्षकांना हा रामच आहे अशी प्रतीती येते हे म्हणणे तरी खरे आहे का? जर ही प्रतीती अबाधित म्हटली, तर ते सत्यज्ञान होते. खरा राम प्रयोगात नसल्यामुळे सत्यज्ञान येथे शक्य नाही. जर ही प्रतीती बाधित होते म्हटले तर तो भ्रम मानला पाहिजे. पण शंकुकाला ह्याठिकाणी भ्रम मान्य नाही. आणि रामाचे काम करणारा काय एक नट आहे? इतर नटांच्या ठिकाणीही हा राम आहे ही प्रतीती येणार. कारण नट रामाचे सामान्य रूप अभिनीत करतो. ह्या सर्व कारणांच्यामुळे सामाजिकांना अनुकरणाचा प्रत्यय नाही, हे सिद्ध होते सामाजिकांच्या प्रतीतीनुसार नाट्यात अनुकरण नसते.
 तोतांच्या अनुकरणवादखंडनाचा हा पाऊण भाग आहे. उरलेले तीन मुद्दे मिळून पाव भाग होतो. हा सगळा पाऊण भाग वाया गेलेला व अप्रस्तुत म्हटला पाहिजे. कारण शंकुकाने प्रेक्षकांना अनुकरणप्रतीती येते असे कुठेच म्हटलेले नाही. लोल्लट अगर शंकुक, नाट्य अनुकरणरूप मानतात. पण प्रेक्षकांचा आस्वाद तादात्म्य पावल्या नंतरच मानतात. आणि प्रेक्षक नटाशी तादात्म्य पावत नाहीत, ते प्रकृतीशी तादात्म्य पावतात. सामाजिकाच्या दृष्टीने नाट्यप्रतीती अनुकरणप्रतीती आहे, असे कुणीच म्हटलेले नसल्यामुळे व शंकुक नाटयप्रतीती अलौकिक मानत असल्यामुळे, अनुकरणवादाच्या ह्या दीर्घ खंडनाला औचित्य फारच थोडे आहे. तोतांची टीका अप्रस्तुत आहे असे काही अभ्यासक मानतात ते ह्यामुळे ( उदाहरणार्थ, मॅसन आणि पटवर्धन अॅस्थेटिक रॅपचर, खंड २, पृष्ठ १३).
 नटाच्या दृष्टीने तरी नाटय हे अनुकरण आहे काय? ह्या प्रभालाही तोतांचे उत्तर नकारार्थी आहे. मी रामाचे अनुकरण करतो आहे असे नटालाही वाटणे शक्य नाही. कारण नटानेही राम पाहिलेला नाही व पूर्वपरिचयाशिवाय अनुकरण शक्य नाही आणि नटाची इच्छा असली तरी तो अनुकरण कोणत्या साधनाने करणार? रामाच्या शोकाने अनुकरण स्वतःच्या शोकाने करावयाचे म्हटले, तर नटाच्या ठिकाणी शोक नसतो. जर नटाच्या ठिकाणी शोक असेल तर मग तो खराच शोक आहे. तिथे अनुकरण मानण्याचे कारण नाही. नट अश्रु आदींनी अनुकरण करतो म्हणाल तर? ही साधने जड आहेत, इंद्रियग्राह्य आहेत. शोक ही इंद्रियग्राह्य नसणारी चित्तवृत्ती आहे.
 बरे, नट सामान्यांचे अनुकरण करतो म्हणावे तर मग सामान्यात नट स्वतःही येतो. त्यामुळे अनुकार्य-अनुकृती हा संबंधच उरत नाही. म्हणून नटाच्या दृष्टीने अनुकरण


56