पान:रससूत्र (Rasasutra).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानणे भागच आहे.
 सामाजिकाच्या प्रतीतीनुसार नाटयात अनुकरण आहे असे म्हणता येणे शक्य नाही. कारण, फक्त इंद्रियगम्य वस्तूचेच अनुकरण शक्य असते. नाटकात जर कुणी मदिराप्राशनाच्या प्रसंगात मी दारू पितो असे म्हणून दूध पिऊ लागला तर आपण असे म्हणू शकतो की, ह्याठिकाणी दूध पिण्याचे कर्म मदिराप्राशनाचे अनुकरण आहे. कारण प्रेक्षकांना मदिराप्राशनाचा अर्थच प्रतीत होईल. पण रती आदी स्थायीभाव असे इंद्रियग्राह्य नाहीत. मग नट रतीचे अनुकरण कोणत्या साधनाने करीत आहे असे म्हणावे? नटाचे शरीर, त्याचे मुकुटादी आभरण, सगळा आहार्य अभिनय, आंगिक सात्विक अभिनय ह्यांपैकी काहीही रतीचे अनुकरण असू शकत नाही. जे इंद्रियग्राह्य जड आहे त्यामुळे इंद्रियग्राह्य नसणाऱ्या चित्तवृत्तींचे अनुकरण होते असे कसे मानावे? ( तोताच्या प्रश्नांपैकी अर्धा भाग सॉक्रेटिसनेही उपस्थित केलेला आहे. सॉक्रेटिसही, तोतांच्यापूर्वी सुमारे २४०० वर्षे हा प्रश्न विचारतो की, अजडाचे अनुकरण करता येणे शक्य आहे का? सॉक्रेटिसने हा प्रश्न विचारल्यानंतरही प्लेटो अ‍ॅरिस्टॉटल आपापल्या पद्धतीने अनुकरणवादच सांगत राहिलेले दिसतात.) अधिकरणभिन्नत्त्वामुळे याठिकाणी अनुकरण मानता येणे शक्य नाही. शिवाय मुख्य वस्तु परिचित असल्या शिवाय अनुकरण हे अनुकरण म्हणून ग्राह्यही होऊ शकत नाही. रामादी प्रकृतींची रती, प्रेक्षकांच्यापैकी कुणालाच परिचित नसते. मूळ व्यक्तीचा परिचय जर प्रेक्षकांना नसेल तर मग सामाजिक नाटयाचे ग्रहण, अनुकरण म्हणून करूच शकणार नाहीत. सबब नट रामाचे अनुकरण करतो हा मुद्दा अग्राह्य आहे.
  जर नटगत चित्तवृत्तीच प्रेक्षकांना रतीचे अनुकरण म्हणून जाणवते व ही नटगत रती रामगत-अनुकार्यगत-रतीचे अनुकरण आहे व म्हणून नटगत चित्तवृत्ती हाच रस होय, असे कुणी म्हणणार असेल तर तेही बरोबर नाही. जर नटाचे हावभाव पाहून, प्रेक्षकांना नटगत रतीचा प्रत्यय येत असेल, तर मग तो लौकिक रतीचा प्रत्यय आहे. तो रस नव्हे. कारण तिथे अनुकरणाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. लौकिक जीवनात आपण व्यक्तीचे हावभाव पाहून त्या व्यक्तीच्या भावना जाणतोच. पण हा चित्तवृत्तीचा आकार व इंगिताने होणारा बोध आहे. त्याचा अनुकरणाशी काहीच संबंध असू शकत नाहीत. त्याला रसही म्हणत नाही. कारण रस नाटयात असतो.

 विभावादिक हे परमार्थतः खरे नसतात; ते कृत्रिम असतात; शिक्षाबल, काव्यबल ह्या योगाने ते कल्पिलेले असतात; हे म्हणणे योग्यच आहे. पण प्रेक्षक ह्या विभावादींचे ग्रहण कसे करतात? जर प्रेक्षकांना विभावादींचे ग्रहण कृत्रिम म्हणून होत असेल तर मग त्याचा अनुमानासाठी वापर होणार नाही. अनी कृत्रिम म्हटल्यावर दाहाची भीती कशी वाटणार? कृत्रिम विभावांनी कृत्रिम रतीचे अनुमान तरी कसे होणार?


५५