पान:रससूत्र (Rasasutra).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ह्या प्रेक्षकाचा आस्वादविषय नाटय आहे; नाट्यप्रयोगात नट आहेत, त्यांचा अभिनय आहे; नाटक काव्य आहे. प्रेक्षकांच्या आस्वादाचा आधार असणारी ही सामग्री आहे. ही सामग्री अभिनयबलाने अनुकार्यगत स्थायीची प्रतीती करून देते. ह्या सामुग्रीचा अनुकार्याशी संबंध कोणता? नट हा राम म्हणून ग्रहण करायचा असेल, तर तो रामसदृश दिसला पाहिजे, तसा तो वागला; बोलला पाहिजे. म्हणजेच नटाने, रामाचे अनुकरण केले पाहिजे. लोल्लट प्रकृतीच्याकडून प्रयोगाकडे, तेथून प्रेक्षकांकडे जातो. त्याच्यासाठी अनुकरणरूप नाटयातच रस आहे. ह्या रसातून तो भावाकडे जातो. दरवेळी नाटयशास्त्र रसोल्लेख, रसविचार आधी घेते. शंकुक ते सहेतुक मानतो. रसातून भाव, ही कल्पना त्याच्यासाठी कविगतरसातून अनुकार्यगत भाव अशी आहे. प्रयोगकर्त्यांच्यासाठी भावातून रस ही भूमिका सिद्ध होते. प्रेक्षकांना प्रतीयमान होणारे भाव या प्रयोगात असणार अनुकरणरूप रस, दोन्हींनाही अभिनयाचाच आधार आहे. रसातून भाव, ह्या कल्पनेचे हे एक महत्त्वाचे स्पष्टीकरण मानले पाहिजे. लोल्लटाला जसा जागोजागी नाट्यशास्त्राचा आधार आहे, तसाच शंकुकालाही नाटयशास्त्राचा आधार आहे. म्हणूनच एखादा टीकाकार असे म्हणून जातो की, शंकुक नाटयंशास्त्राच्या अभिप्रायाचा अधिक प्रामाणिक प्रवक्ता आहे. ( उदाहरणार्थ मॅसन आणि पटवर्धन; अ‍ॅस्थेटिक रॅपचर, खंड १, पृष्ठ १०) नाटयशास्त्रातील भूमिका स्वतःशी सुसंगत होतानाच कशी अडचणी येते, हेही एकदा विस्ताराने तपासून घेतले पाहिजे. ह्या तपासणीला आरंभ परंपरेतील शंकुक खंडनापासून करता येईल.
  लोल्लटाचे शंकुककृत खंडन जसे प्रसिद्ध आहे. तसे शंकुकाचे भट्ट तोतकृत खंडनही प्रसिद्ध आहे. भट्टनायकानेही शंकुकाचे खंडन केलेले असणार. पण ते आता उपलब्ध नाही. भट्ट तोत हे अभिनवगुप्तांचे साक्षात गुरू. तेव्हा त्यांचा काळ अभिनवगुप्तांच्या काळाशी अपरिहार्यपणे संलग्न आहे. भट्टतोतांचा काळ इ. स. च्या दहाव्या शतकाचा उत्तरार्ध आहे हे बहुतेकजण मान्य करतात. त्यांच्या ग्रंथांचे नाव 'काव्यकौतुक' होते. आज हा ग्रंथ उपलब्ध नाही.
 भट्ट तोताचा प्रमुख आक्षेप, अनुकरणवादावर आहे. जरी शंकुकाच्या निमित्ताने त्यांनी आक्षेप घेतले आहेत, तरी ते लोल्लटाच्या विरोधातही तितकेच प्रस्तुत आहेत. कारण दोघेही अनुकरणवादी आहेत. भट्ट तोतांची टीका प्रथमदर्शनी तरी चौरस व बिनतोड वाटते. प्रा.नोली हयांनी तोतांचा युक्तिवाद व्युत्पन्न व सूक्ष्म मानला आहे. तोतांनी या प्रश्नाचे चार भाग केलेले आहेत. रस अनुकरणरूप आहे, हे आपण कोणत्या अभिप्रायाने म्हणणार? सामाजिक प्रतीतीनुसार हे अनुकरण आहे का? नटाच्या दृष्टीने तरी अनुकरण आहे का? वस्तुवृत्त म्हणून अनुकरण सांगता येईल का? ही भूमिका भरतमुनी संमत आहे का? त्यांचे म्हणणे असे की, जर हया चारही प्रश्नांची उत्तरे, नकागर्थी देणे भाग असेल तर मग नाटयात अनुकरण नाही असे


५४

.