पान:रससूत्र (Rasasutra).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून भावप्रतीती फक्त रसिकांना आहे. मात्र ह्या भावप्रतीतीत, अभिमान धारण करणारे रसिक ही जशी एक बाजू असते तसेच अभिनय करणारे नट ही दुसरी बाजू असते. लोल्लटाच्या विवेचनात नट अनुकार्याशी समरस होतो ह्याला महत्व आहे. शंकुकाने नटाच्या शिक्षणबलाला महत्त्व दिलेले आहे. कारण नटाला भावास्वाद नाही.
 ही सगळीच चर्चा, नाट्याच्या संदर्भात चालू आहे. काव्याच्या संदर्भात ही चर्चा कशी करावयाची? ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर शंकुकाच्या विवेचनात नाही. पण पुढचे विवेचक साधनभेद असला तरी नाटयाप्रमाणेच काव्याची प्रतीती आहे, असे मानतात. नाटय ज्याप्रमाणे प्रसंग नजरेसमोर उभा करते, त्याचप्रमाणे काव्य मनःचक्षुसमोर प्रसंग उभा करते. म्हणून दोन प्रत्ययांत मूलतः भेद आहे असे मानण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणही दिले जाते. अशासारखीच भूमिका शंकुकाने घेतली असावी, असे अनुमान करणे भाग आहे. कारण कार्याकडे दुलक्ष करणे शंकुकाला शक्य नव्हते. मात्र ह्याबाबत निर्णायक मत देता येणार नाही.

 शंकुकाचा पक्ष, हा लौकिक पक्ष समजावा की, अलौकिक पक्ष समजावा, ह्या प्रश्नाचे कधीतरी स्पष्टपणे उत्तर दिले पाहिजे. तो रस आणि विभाव फक्त नाटयात मानतो; नाटयप्रतीती अलौकिक मानतो. ह्या दोन मतांच्यानंतर त्याचा पक्ष लौकिपक्ष मानणे कठीण आहे. तो नाटय अनुकरणरूप मानतो. अनुकार्यगतत्त्वाने स्थायीची उत्पत्ती मानतो. नाटयाचे फल केवळ हर्षच आहे, असे तो मानत नाही. सामाजिक ज्या भावांची चर्वणा करतात ते अलौकिक भाव आहेत म्हणून त्यांना आनंदेच होतो असे म्हणत नाही. उलट करुणरस विवेचनात, त्याचे जे मत उल्लेखिलेले आहे ते पाहाता तो प्रेक्षकांना शोकप्रतीती येते असे सांगताना दिसतो. हे पाहिल्यानंतर, त्याचा पक्ष अलौकिकपक्ष आहे असे मानणे कठीण जाते. सत्य असे आहे की, लौकिकपक्ष व अलौकिकपक्ष ही विभागणी उत्पत्ती की अभिव्यक्ती अशी नसून काव्यानंद म्हणजे काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरावर आधारलेली आहे.
  फक्त लोल्लट, शंकुक हेच असे विवेचक आहेत की, ज्यांच्या विवेचनात, रसांचे जन्यजनकसंबंध चपखलपणे बसतात. एक भाव दुसऱ्या भावाचा जनक होतो हे लौकिकातही आपण पाहातो. एकाचा क्रोध दुसऱ्याला भीतिदायक वाटतो. जोपर्यंत भाव हेच रस होतात, असे आपण प्रतिपादन करीत आहो व मूलतः प्रकृतींचे मानतो आहो, भावांची उत्पत्ती मानतो आहो, तोपर्यंतच रसांची जन्य-जनकता सांगता येते. शंकुकाची जी मते पुढे स्थिरपणे प्रतिष्ठित झाली, ती पाहिली, तर शंकुक हा संस्कृतभाष्यकारांच्यापैकी अतिशय प्रभावी भाष्यकार मानणे भाग आहे. जे काव्यशास्त्र, अभिनवगुप्तात पूर्णतेला गेले, त्या दिशेचा आरंभ शंकुकापासून होतो. आस्वाद घेणा-या प्रेक्षकाला महत्त्व देऊन तो विचार करतो. शंकुकाचा आरंभबिंदू प्रेक्षक हा आहे. हे प्रेक्षक समरस होऊन प्रयोगाचा आस्वाद घेतात इथून तो आरंभ करतो.


५३