पान:रससूत्र (Rasasutra).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरच्या नगरीत काय चालले आहे ते पाहू शकतात, ह्या श्रद्धा नैय्यायिकांना मान्यच होत्या. ज्या प्रतीतीने योग्यांना हे ज्ञान होते तिला योगलक्षणा अगर योगज म्हणत. न्यायाच्या पद्धतीने ह्या बाबी स्पष्ट करता न आल्या, म्हणजे नैय्यायिक अलौकिक प्रतीतीचा आधार घेत असा ह्याचा अर्थ आहे. पण हे सारे बोधकक्षेतले आहे. भावाचे ज्ञान हेही बोधकक्षेतले आहे. भावप्रतीतीची कक्षा निराळी आहे. म्हणून नैय्यायिक, काव्यशास्त्रज्ञ, काव्य, नाटय व्यवहारासाठी अजून एक अलौलिक प्रतीती सिद्ध करू पाहत होते. असे दिसते की ह्या गटात शंकुक येतो. भावप्रतीती अवगमन व अभिनय हा व्यवहारच निराळा आहे. अलौकिक आहे असे हे मत आहे. न्यायशास्त्रात ही भमिका मान्य होऊ शकली नाही. पण ह्या अलौकिक प्रतीतीच्या भूमिकेने पुढचे काव्यशास्त्र प्रभावित केले आहे.
  शंकुक अनुमानवादी का नाही, हे आता स्पष्ट होण्यास हरकत नसावी. आनंदवर्धनांनी 'ध्वनीचा अंतर्भाव काही जण अनुमानात करीत असे म्हटले आहे. आनंदवधनोत्तर काळात, ह्या भुमिकेचा प्रमुख प्रवक्ता महिमभट्ट होता. हे अनुमानवादी ध्वन्यर्थ हे एकप्रकारचे अनुमान आहे असे समजत. अनुमानाचा आश्रय अनुकर्ता असतो. शंकुक अवगमन मानतो. अवगमनाचे कारण शब्दांचा अभिनय. हे असते. अवगमन, फक्त स्थायीभावांचे होते, इतर कशाचेही होत नाही. विभावादींच्यासाठी शंकुक अभिनयाची गरज मानत नाही ध्वन्यर्थ वस्तू अलंकार, रस असा तीन प्रकारचा असतो, असे ध्वनिवादी म्हणत. हेच अनुमानाला लागू आहे असे अनुमानवादी म्हणत. शंकुकाला आनंदवर्धनापूर्वीचा मानण्याचे कारण हेच आहे की, तो शब्दांचा भावनात्मक परिणाम कसा होतो ह्या प्रश्नाचे उत्तर नाटयशास्त्राला अनुसरून, स्थायीभाव, वाक-अंग-सत्त्वाने उपेत होतो, म्हणजे अभिनयाने उपेत होतो, हे देतो. ह्या संदर्भात शब्दशक्तीचा विचार करीत नाही. शब्दांना अभिनयाशिवाय भावप्रतीती करून देण्याचे सामर्थ्य आहे, असे तो मानत नाही. लोल्लटानुसार शंकुक हे मानतो की, काव्यात, नाटकात व्यक्त होणारे भाव, प्रकृतींचे असतात. मात्र हे भाव शंकुकाला रस म्हणून मान्य नाहीत. त्याच्या मते अनुकरणरूप भावांना रसाचे स्थान प्राप्त करून दिले जाते.
  शंकुकाच्या विवेचनात रसिकांचे स्थान काय आहे? अनुकरणरूप नाटयात सगळे कृत्रिमच असते. पण प्रेक्षक मात्र कृत्रिम म्हणून अनुकरण न पाहाता, अनुकार्य म्हणूनच अनुकऱ्यांची प्रतीती आस्वादक्षणी घेत असतात. ह्या विवेचनात ह्या प्रतीतीला अभिमान म्हटले आहे. नटाला रामरूपाने ग्रहण करणे हा अभिमान आहे. ह्या अभिमानाचे कारण काव्याचे अनुसंधान हे असते. वेगळ्या पद्धतीने सांगावयाचे तर काव्यातील शब्द व अनुकरण ह्या आधारे प्रेक्षक तादात्म्य पावतो. त्याचा भावानुकरणात प्रवेश होतो. असा अभिमान जे धारण करतील, त्यांच्यासाठीच स्थायींचे अवगमन आहे.


52