पान:रससूत्र (Rasasutra).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णारी ठरली, तर ती आलंबन विभाव ठरणार असल्यामुळे; शंकुक अनुमानाची कल्पना मान्य करू शकला नसावा, असे मला वाटते. ह्या स्पष्टीकरणात हेही गृहीत आहे की, नाटयास्वादातील भावप्रतीती, ही स्वगत भावोत्पत्ती नव्हे. नैय्यायिक अनुमानवादीच असले पाहिजेत, ह्या हट्टाग्रहात दुहेरी चूक होण्याचा धोका असतो. प्रथम इतरही सर्व दर्शने ( चार्वाक दर्शनही) अनुमानप्रमाण मानतात, ह्याकडे दुर्लक्ष होते. दुसरे म्हणजे नैय्यायिकही अनुमानाखेरीज अजूनप्रमाणे मानतात; इकडेही लक्ष जात नाही.
 शंकुक हे प्रथम स्पष्ट करतो की, शब्दांच्या योगाने भावांचे अभिधान होते. ह्या अभिधानापेक्षा अवगमन निराळे आहे. अभिधानापेक्षा अवगमनाचे निराळेपण कशात आहे? शंकुकाच्या मते हे निराळेपण अभिनयात आहे. केवळ वाणी म्हणजे वाचिक अभिनय नव्हे. त्याचप्रमाणे केवळ अंग म्हणजे आंगिक अभिनय नव्हे. अभिनयाचे वैशिष्टय, ते प्रेक्षकांच्यावर परिणाम काय करतात, ह्यावर असते. येथे शंकुक अभिनयशब्द नाटयशास्त्राला अनुसरून वापरीत आहे. अभिनय, अर्थ प्रेक्षकांच्यापर्यंत नेतात. शंकुकाच्या मते नाटयात हा प्रेक्षकांच्यापर्यंत नेण्यात येणारा अर्थ स्थायीभाव आहे. आलंबन-उद्दीपन-विभाव आणि भावनिर्मितीचे आश्रय अनुकार्यगत आहेत. अनुकर्ते अभिनय करीत आहेत; हे अनुकरण आहे. हा अभिनय वाचिक, आंगिक, आहार्य सात्त्विक असा आहे. ह्या अभिनयाच्या योगाने स्थायीभाव प्रेक्षकांच्यापर्यंत जातो. हे स्थायीचे अभिधान नव्हे. हे प्रेक्षकांच्या मनात होणारे अवगमन आहे. ते बोधस्वरूप नसून, ती प्रतीती आहे. नाट्यातील विभावादी सामग्री, लिंग आहे. पण ही लिंगे, अनुमानाला आधार नाहीत. अनुमान तर लौकिकातही आहे. येथे लिंग अवगमनाचा आधार आहे. हा व्यवहार फक्त नाटयात घडणारा म्हणून अलौकिक आहे व म्हणून नाटयप्रतीती अलौकिक आहे.
 उत्तरकालीन नैय्यायिकात शोध घेताना, असे दिसते की, नैय्यायिक अलौकिक प्रतीत ही कल्पना, मान्य करणारे होते. ते अलौकिक प्रतीती तीन प्रकारची मानत. हे तिन्ही प्रकार काही अडचणींचा परिहार करताना स्वीकारावे लागले आहेत. ह्यांपैकी एका अलौकिकप्रतीतीला सामान्य लक्षण म्हटले जाई. विशिष्टाचा बोध प्रत्यक्ष प्रमाणाने होतो. पण जी जातिवाचक सत्ये आहेत, ती आपणाला कशी कळतात? त्याशिवाय न्यायाला मूलभूत असणारी व्याप्ती कशी ठरणार? उदाहरणार्थ, माणूस मर्त्य आहे. हे आपणास कसे कळते? नैय्यायिक असे मानीत की हा बोध सामान्यलक्षण ह्या अलौकिक प्रतीतीमुळे होतो. कधी असे प्रत्ययाला येते की एका इंद्रियाचे ज्ञान दुसऱ्या इंद्रियाला होत आहे. उदाहरणार्थ, बर्फाचा थंडपणा डोळ्यांना जाणवतो. ह्या अलौकिक प्रतीतीला ते ज्ञानलक्षण म्हणत. नैय्यायिकही धार्मिक होते. त्यांचा ईश्वर, पुनर्जन्म, मोक्ष ह्या कल्पनांच्यावर विश्वास होता. तेही योग्यांना आदरणीय मानत. योग्यांच्याजवळ भविष्यज्ञान असते; परोक्ष विषयाचे ज्ञान असते; ते इथे बसून मैला


51