पान:रससूत्र (Rasasutra).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आरंभ असणारे वाक्य असते. मधूनच भोवतालच्या वातावरणाचे वर्णन असते. हा जो सगळा शब्दव्यापार चालतो, त्याशिवाय विभाव समूर्त होणारच नाहीत. कारण प्रयोगात सगळेच दाखविता येणार नाही. फार मोठा भाग केवळ शब्दांनी वर्णन करण्यावर अवलंबून असतो. शाकुंतलातील आश्रम वर्णन असे आहे. म्हणून शंकुक म्हणतो, विभाव काव्यबलाने जाणले जातात. शंकुकाच्या विवेचनात हे काव्यबल वाचिक अभिनयापेक्षा निराळे आहे
.  ह्यानंतर आपण शंकुकाच्या भूमिकेतील रसाचा विचार करू शकतो. नाट्यशास्त्रानुसार, आस्वादविषय होणे हे रसाचे प्रमुख लक्षण मानले तर आस्वादय होण्याचा योग अनुकरणरूपाला आहे. हे जे नाटयप्रयोगातील अनुकरणरूप तेच रस मानले पाहिजे. हेच शंकुकाने अनेकदा म्हटले आहे. ६।३३ नंतरच्या गद्यावर भाष्य करताना अभिनवगुप्तांनी शंकुकांचे नाव घेऊन अनुकरणवादाचे खंडन केले आहे. म्हणून शंकुकाला अनुकरणवादी म्हणता येईल. पण रससूत्र, रसाची निष्पत्ती सांगणारे सूत्र आहे. शंकुकाच्या मताने अवगमनाच्या योगाने आस्वादाचा आरंभ होतो. म्हणजे निष्प्रती अवगमनाची होते. हा आस्वाद चर्वणारूप आहे म्हणून (लोचनाच्या आधारे) मम्मट चर्व्यमाण स्थायी म्हणजे रस असे मत शंकुकाच्या नावे नोंदवितात. स्वतः अभिनवगुप्त-मम्मटांच्यासाठी प्रेक्षक ज्याची चर्वणा करतात, तोच रस आहे. हा अभिप्राय मनात ठेवून केलेले शंकुकाचे एक महत्त्वाचे स्पष्टीकरण म्हणून, ह्या मांडणीचा विचार करता येईल. पण काहीही म्हटले तरी हा अनुमितीवाद नव्हे.
 अनुकरण, लिंग ह्या शब्दांना काव्यविचारात एक महत्त्वाचे स्थान आहे. लिंग ही न्यायाची कल्पना आहे. धूर आपण पाहातो आणि अग्नीचे अनुमान करतो ह्या प्रक्रियेत धूर हे लिंग आहे. धुरावरून जे अग्नीचे अनुमान होते तो विशिष्ट अग्नी नसून सामान्य अग्नी असतो. अनुमानाने विशिष्टाचे ज्ञान होतच नाही, सामान्याचे ज्ञान होते. अनुकरणाच्या बाबतीतसुद्धा हेच आहे. कारण विशिष्ट हे अनुकरणात सामान्य होऊन जाते. अनुकरण कधी मूळ वस्तू निर्माण करू शकत नाही, ते फक्त सदृश वस्तू निर्माण करू शकते. अनुकरणाला ज्यावेळी तदात्मक, तत्प्रभव म्हणतात, त्यावेळी अनुकार्याशी शक्यतो सदृश असण्याचा हेतूच लक्षात घ्यावयाचा असतो. एकीकडे नाट्यशास्त्रात रसांना आत्मा म्हणण्याऐवजी स्थायीभावांना रसांचा आत्मा म्हटले आहे. ते शंकुक आपल्या विवेचनात अनुस्यूत करून घेतो. दुसरीकडे साधारणीकरणाच्या कल्पनेचा तो पाया भरतो. ही साधारणीकरणाची कल्पना पुढे विकसित झाली आहे; त्याचा शंकुक हा आरंभ आहे.
 शंकुकाने, अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणतो नाट्यप्रतीती ही तत्त्वप्रतीती नव्हे; संदेह नव्हे अगर विपर्यय, म्हणजे भ्रम नव्हे. उद्भटाने त्यापूर्वी नाट्यप्रतीती मानली होती. नाटयप्रतीती हा भ्रम आहे; जे भाव नटाच्या ठिकाणी


४9