पान:रससूत्र (Rasasutra).pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान्य केलेले आहे. नाटय म्हणजे अनुकरण व रस अनुकरणरूप हया भूमिकेतून पुढे नाटय म्हणजेच रस हया कल्पनेचा उदय झालेला आहे. अनुमान असे की पुढे बहुमान्य ठरलेल्या हया मताचा आधार शंकुकात असला पाहिजे. जे अनुकरणरूप आहे त्याला त्याचे हे रूप समजावे हयासाठी नवे नाव हवेच. म्हणून अनुकरण रूप स्थायीला, रस हे वेगळे नाव आहे. शंकुकाने हया पद्धतीने स्थायीभाव आस्वादिले जातात म्हणून रस होतात, हे नाट्यशास्त्राचे मत व रससूत्र व्यवस्थितपणे स्वतःच्या भूमिकेत सामावून घेतले आहे.
 नाटयातील विभावांचे स्वरूप काय मानावे हा एक प्रश्न आहे. लोल्लटाने विभावांचा विचार नाटयांतर्गत प्रकृतीच्या संदर्भात केलेला आहे. म्हणजे राम ही प्रकृती विभाव आहे. नाट्यप्रयोगात विभावांचे अनुकरण आहे. लोल्लटाचे हे म्हणणे नाटयशास्त्रातील प्रकृती विचारांशी सुसंगत असले तरी, सहाव्या-सातव्या अध्यायाशी विसंगत आहे. समजा स्थायीभाव पुष्ट झाला, पण तरी तो आस्वादविषय झाला नाही, तर काय समजावे? लोल्लटाच्या रसकल्पनेला नाट्यप्रयोग अपरिहार्य नाही.नाटयशास्त्रानुसार वाक्, अंग आणि अभिनत ह्यांच्या आश्रयाने विभाव बहू-अर्थ विभावित करणारे असले पाहिजेत. म्हणून विभाव फक्त नाटयातच असणार शंकुकाने विभाव फक्त नाट्यात असतात अशी भूमिका घेतली आहे. पुढे सर्वांनी त्याचे हेही मंत मान्य केलेले दिसते. हे विभाव कृत्रिम असतात. शंकुकाचा कृत्रिम शब्द संदर्भानुसार विभाव, अनुभाव, व्यभिचारी ह्या तिन्ही घटकांना उद्देशून आहे, असे मानणे भाग आहे. नाहीतर, फक्त व्यभिचारीभाव कृत्रिम मानावे लागतील. व्यभिचारीभाव तर कृत्रिम आहेतच. ते शंकुकाने स्पष्टच म्हटले आहे. पण अनुभावही शिक्षणाने साध्य म्हणजे कृत्रिम आहेत. विभाव काव्यबलाने ओळखले जाणारे, म्हणजे कृत्रिमच आहेत. ह्या मुद्दयावर शंकुकाचे मत स्पष्ट करणारे, सहमत आहेत. पुढे कित्येकदा असे स्पष्टीकरण भाष्यकारांनी केलेले आहे की, विभाव अलौकिक आहेत. इतर कुणाला असे मानण्याची गरज वाटली तरी शंकुकाला ती वाटत नाही. विभाव फक्त नाटयातच असून ते कृत्रिम आहेत, इतके म्हणणे त्याला पुरते. लौकिक जीवनातील कारणे, निमित्ते व हेतु अनुकरणरूप नाट्यात विभाव होतात. हे विभाव लिंग आहेत, म्हणजे प्रेक्षकांच्यासाठी अवगमनाची सामग्री आहेत, पुढे चालून विभाव आस्वादव्यापाराची साधनसामग्री आहे, हे मत बहुमान्य झालेले आहे.
 हे विभाव काव्यबलाने जाणले जातात असे म्हणण्याचे कारण आहे. जरी रामचंद्रासारखा पोषाख नटाने केला तरी तो राम म्हणून ओळखला जाणार नाही. म्हणूनच नाटयापूर्वी प्रस्तावना असते. उत्तररामचरित्रातील सूत्रधार मी आता अयोध्येचा रहिवासी झालो आहे, असे सांगून रामाच्या राज्याभिषेकाचे वर्णन करू लागतो. अशा प्रस्तावनांच्यामुळे पुढे प्रकृती ओळखू येतात. प्रत्यक्ष प्रयोगातही, 'हे सीते' असा


४८