पान:रससूत्र (Rasasutra).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुमान आहे.
  शंकुकाच्या खंडनामुळे प्रथम व भट्टनायकाच्या खंडनामुळे शेवटी लोल्लटाचे विवेचन बाधित झाले असे समजतात. ह्या आक्षेपांचे स्वरूप तरी काय आहे हे एकदा समजून घेतले पाहिजे. ह्या आक्षेपांचे महत्त्वही ठरविले पाहिजे. शंकुकाच्या मते विभाव, अनुभाव, व्यभिचारी हे लिंग आहेत. ह्या लिंगाच्या साह्यानेच स्थायींचे ज्ञान व अनुमान होणार. विभावादी एकीकडे आणि स्थायी दुसरीकडे यांचा परस्पर संबंध जर ज्ञाप्य ज्ञापक भावाचा असेल तर मग विभाग अनुभाव व्यभिचाराचा, स्थायी भावाशी संयोग कसा होणार ? कारण संयोग होण्यासाठी स्थायीभाव विभावाच्यावाचून अभिधेय व्हायला हवा. स्थायी व विभाव स्वतंत्रपणे अस्तित्वात असायला हवे. मग त्याचा संयोग होऊ शकतो. जे स्थायी भावाच्या विषयी म्हणता येईल, तेच इतर सर्व भावांच्या विषयी म्हणता येईल.
  शंकुकाचा हा आक्षेप त्याच्या कुशाग्र नैय्यायिक बुद्धीतून निघालेला आहे. असे आक्षेप एकाच वेळी दोन बाजूंनी एखादा मुद्दा कात्रीत धरून कापून काढणारे व तो मुद्दा मांडणाऱ्याला हास्यास्पद ठरविणारे असतात. जर विभाव, अनुभाव, व्यभिचारी ह्यांचा स्थायीशी संयोग व्हायचा असेल तर मग स्थायी स्वतंत्ररीत्या अस्तित्वात येऊन त्याचा विभावाशी संयोग झाला पाहिजे. जर हे मान्य केले तर मग विभाव स्थायीच्या अनुमीतीचे आधार असणार नाहीत. तेव्हा विभाव स्थायी भावांच्या विज्ञानाचे कारण आहेत, हा लोल्लटाचा मुद्दा बाद मानला पाहिजे. ही आक्षेपाची एक दिशा आहे. उलट विभावांच्या वाचून स्थायी अभिधेय होतात असे मानले तर स्थायीभावांना स्वतः सिद्ध अभिधेयता मानावी लागेल. जर भाव स्वतःच अभिधेय होतात, उत्पन्न होतात असे मानले तर मग त्यांना निर्माण करण्यासाठी विभावांची गरज संपली. ते गम्य होण्यासाठी अनुभावाचीसुद्धा गरज लागणार नाही. रूद्रट, उद्भट आदी समीक्षक भाव स्वशब्द वाच्य समजत; किंबहुना ध्वनिपूर्वकाळातील बहुतेकांचे हे मत होते पण ते सुद्धा भावांना स्वतः सिद्ध अभिधेयता मानीत नसत. जे स्वतःच निर्माण होतात, ज्ञान विषय होतात ते स्वतःच उपचित होऊ शकतील, म्हणून पुष्टीसाठी व्यभिचारी भावाचीही गरज संपली. ही आक्षेपाची दुसरी दिशा आहे. भाव स्वतः अभिधेय होतात असे म्हटले तरी आणि ते विभावांनी उत्पन्न होतात, असे म्हटले तरी उभय पक्षी लोल्लटाची भूमिका चूक आहे असा शंकुकाचा आक्षेप आहे.
 भावांना स्वतःसिद्ध अभिधेयता कुणीच मानत नाही. लोल्लटही मानत नाही. म्हणून ह्या दिशेने घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देण्याची गरज नाही. कारण ती कुणालाच अभिप्रेत नसणारी बाजू आहे. प्रश्न पहिल्या दिशेचा आहे. स्थायीभाव अगर कोणताही भाव विभावांनी उत्पन्न होतो, निर्माण केला जातो हे नाट्यशास्त्राचे मत ' आहे, ते लोल्लटाने स्वीकारले आहे. हे मत जर सदोष असेल तर त्याचे दायित्व


25