पान:रससूत्र (Rasasutra).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नाही ती दुबळी जागा लोल्लटात नसणार हे उघड आहे. शिवाय नाटयशास्त्रात वेळोवेळी स्थायी उत्पन्न केला जातो, असा उल्लेख केला आहे. स्थायी उत्पन्न होतो, स्थायी पुष्ठ होतो हे म्हणणाऱ्यांना स्थायी वासनात्मक असतो असे म्हणता येणार नाही.
"  न सहभाविनः " वासनात्मक, उद्भूतता हे मुद्दे पूर्णपणे वगळूनही आपण लोल्लटाचा विचार करू शकतो. प्रथमच हे सांगितलेले आहे की स्थायीभाव ही चित्तवृत्ती असून विभावांनी उत्पन्न केली जाते. विभावादिकांचा म्हणजे विभाव अनुभाव संचारींचा स्थायींशी संयोग होतो असेही म्हटले आहे. ह्या भूमिकेत सुप्तपणे एका संभाव्य प्रश्नाचे उत्तरही अनुस्यूत आहे. तो संभाव्य प्रश्न असा की रससूत्रात स्थायीचा उल्लेख का नसावा ? हा प्रश्न शंकुकापासून पुढे महत्त्वाचा ठरला आहे. लोल्लटाच्या भूमिकेनुसार ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की उपचित स्थायीभाव हाच रस होतो. यामुळे रसनिष्पत्तीचे सूत्र स्थायीभाव उत्पन्न कसा होतो, उपचित कसा होतो हे सांगणारेच सूत्र आहे. सगळी रसचर्चाच स्थायीभाव रसत्वापर्यंत कसा जातो हे सांगणारी असल्यामुळे रसशब्दाने उपचित स्थायीचा उल्लेख केल्यानंतर पुन्हा रससूत्रात स्थायीभावाचा वेगळा उल्लेख करण्याची गरज राहत नाही. स्थायीभाव रस होतो ही नाटयशास्त्राची भूमिका आहे. ही भूमिका लोलटाच्या विवेचनाशी जशी एकरूप आहे तशी इतर कुणाच्या भूमिकेशी एकरूप नाही. अभिनवगुप्तांना " स्थायी रस होतो." हे नाटयशास्त्रातील वचन एक औचित्यवाद मानावे लागले आहे. लोल्लटाची भूमिका स्थायीबाबत उत्पत्तिवादी आणि रसांच्या बाबत पुष्टिवादी आहे. त्या क्रमाने लोल्लट समजून घेताना वासनात्मक, उद्भूत या चर्चेची गरज नाही.
 शंकुकाच्या आक्षेपात नसलेला लोल्लट समजून घेण्यास आवश्यक नसणारा, उलट अडथळा करणारा हा वासनात्मकतेचा मुद्दा मग निर्माण कसा झाला ? ह्याबाबत निर्णायक असे काही सांगता येणार नाही, पण अनुमान करता येईल. नाट्यशास्त्रात स्थायीभावाचा व्यभिचारी भावांना आश्रय असतो, असा मुद्दा आलेला आहे. एकच व्यभिचारी भाव अनेक रसांतून संचार करणार, अशावेळी हा व्यभिचारी भाव, कोणता स्थायीभाव उपचित करणार आहे असे समजावे ? याचे उत्तर असे संभवते की उदभूत होणाऱ्या व्यभिचारी भावाच्यामागे वासनात्मक स्थायी असतात. उदा० शंका श्रृंगारातही आहे, भयानक रसातही आहे. ज्यावेळी शंकेच्या मागे वासनात्मक रूपात रती असते तेव्हा हा व्यभिचारी भाव शृंगारातील समजावा. अशा प्रकारची शंका फक्त रतीच पुष्ट करू शकते. उलट शंकेच्या मागे वासनात्मक स्वरूपात भय असले तर तो व्यभिचारीभाव भयानक रसातील समजावा. नाट्यशास्त्रात 'बहुआश्रयत्वात् ' हे जे स्थायीभावाचे स्वरूप आहे, त्याचे स्पष्टीकरण करताना हा मुद्दा आलेला असावा व पाठभ्रंशामुळे सर्व गुंतागुंत निर्माण झाली असावी असे दिसते. पण हे .

२४