पान:रससूत्र (Rasasutra).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्यामुळे स्थायीभावही उद्भूत होतात असे मानले पाहिजे. सारेच भाव वामनात्मक व उद्भूत या दोन अवस्थांत असू शकतात असे म्हटले पाहिजे, अभिनवगुप्त ज्यापद्धतीने वासनात्मकाची कल्पना स्पष्ट करतात ती लोल्लटाला अभिप्रेत मानता येत नाही आणि लोल्लटाने वासनात्मक व उद्भूत ही विभागणी का केली हेही सांगता येत नाही.
  व्यंजनात काही चवी वासनात्मक असतात म्हणजे तरी काय ? तिखट, मीठ, हिंग, जिरे ह्यांच्या चवी वासनात्मक आणि एकूण व्यंजनाची चव उद्भूत म्हणावी काय ? असे म्हटले तर त्याचा अर्थ हा होतो की एक उद्भुत चव निर्माण करण्यासाठी अनेक वासनात्मक चवी एकत्र याव्या लागतात. हा अनवस्था प्रसंग आहे. कारण ह्यामुळे एक व्यभिचारी उद्भूत होण्यासाठी, अनेक स्थायी एकत्र यावे लागतील. स्थायी भावांचा समूह हे कारण व व्यभिचारी भाव हे कार्य असे म्हणावे लागेल. लोल्लटाला हे निश्चितच म्हणाषयाचे नाही. जर तिखट, मीठ इत्यादींच्या चवी उद्धृत व एकूण व्यंजनाची चव वासनात्मक मानली तरी अनवस्था प्रसंग आहेच. कारण मग व्यभिचारी भाव हे स्थायीचे जनक मानावे लागतील. स्थायींच्या पुष्टीसाठी व्यभिचारीच शिल्लक राहणार नाहीत. लोल्लटाला हेही अभिप्रेत नव्हतेच.
  हा सगळा दृष्टांत बाजूला सारता येईल का? मम्मटाने त्या दृष्टांताचा उल्लेख केलेला नाही. तसे करता येणार नाही. कारण दृष्टांत नाट्यशास्त्रातच आहे व त्याचे काहीतरी स्पष्टीकरण लोल्लटाला देणे भागच होते. ते त्याने दिलेले असणार. अभिनव भारतीतील विवेचन लोल्लटाचा अभिप्राय नीट कळण्यास साह्यकारी होत नाही एवढाच माझा मुद्दा आहे.
 मम्मटाने लोल्लटाचा विचार केला आहे. हा विचार करताना मम्मट असे नोंदवितात की व्यभिचारी भाव हे स्थायी भावांचे सहकारी आहेत. ते सहकारी असल्याशिवाय त्यांचा स्थायीशी संयोग कसा होणार व ते स्थायी भावांना पुष्ट तरी कसे करणार ? मम्मटांनी अर्थातच वासनात्मक व उद्भूत हा प्रश्न उपस्थित केलेला नाही. " न सहभाविनः" हा मुद्दा देखील त्यांच्यासमोर नाही. पण मम्मट हे अभिनवगुप्तांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनी एखाद्या तपशिलाचा उल्लेख केला नाही. हा मुद्दा अभिनवगुप्तात उल्लेख आहे, त्या मुद्दयांइतका महत्त्वाचा मानता येत नाही. अभिनवगुप्ताच्या पूर्वीचा टीकाकार, शंकुक आहे. लोल्लटाचे प्रमुख व विस्तृत खंडन शंकुकाचे आहे. शंकुकाने न्यायपरंपरेप्रमाणे बारीक-सारीक मुद्दयांवर आक्षेप घेतलेले आहेत. पण या आक्षेपात जे सहभागी नाहीत त्यांचा संयोग कसा होईल असा आक्षेप घेतलेला नाही. शंकुकाच्यासाठी स्थायी वासनात्म आहे. ही अत्यंत आक्षेपार्ह बाब असायला हवी. वासनात्मक स्थायी उद्भूत होताच व्यभिचारी होतो आणि उद्भूत न होता पुष्ट होऊ शकत नाही. शंकुक ज्या दुबळ्या जागेवर आक्षेप घेत


२३