पान:रससूत्र (Rasasutra).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



अनुभाव रसजन्य म्हणून विवक्षित नाहीत. म्हणून त्यांची ( त्या अनुभवांची) गणना रस कारण या नात्याने करता येत नाही. तर ( रस कारण म्हणून) भावाचीच (गणना) करता येते. ते जे अनुभाव आणि व्यभिचारी भाव चित्तवृत्तीरूप असल्यामुळे जरी स्थायीचे सहभावी नाहीत तरी वासनात्म म्हणून ते येथे विवक्षित आहेत. दृष्टांतातसुद्धा व्यंजनादी पदार्थामध्ये काही पदार्थ स्थायीप्रमाणे वासनात्मक असतात. तर काही पदार्थ व्यभिचारी प्रमाणे उदभूत असतात. त्यामुळे विभावादींनी उपचित झालेला स्थायी म्हणजे रस. अनुपचित असला म्हणजे स्थायी. तो रस उभय ठिकाणी आहे. आनुकार्याच्या ठिकाणी व अनुसंधानबलाने अनुकर्त्याच्या ठिकाणी. प्राचीनांचा हाच पक्ष आहे."
  मूळ उताऱ्याचे हे भाषांतर पाहिले तर असे आढळून येईल की हा उतारा लोल्लटाचे मत समजून घेण्यास साह्यकारी होण्याऐवजी अडथळाच करीत आहे. ह्या उताऱ्यात असा उल्लेख आलेला आहे की येथे विवक्षित असणारे अनुभाव रसजन्य नाहीत. हा उल्लेख मुद्दाम करण्याचे कारण काय असावे? लोल्लटाचे विवेचन रससूत्रावर चालू आहे. रससूत्र, रसांची निष्पत्ती कशी होते हे सांगणारे सूत्र आहे. रससूत्रात उल्लेख असणारे विभाग, अनुभाव, व्यभिचारीभाव यांपैकी कोणताच घटक रसजन्य असणार नाही. कारण सूत्रातील सारे घटक जनकसामग्री म्हणून आलेले आहेत. त्या प्रश्नाची दोन रूपे आहेत. लोल्लटासमोर एक पक्ष असा संभवतो की जो रससूत्रातील विभाव, अनुभाव, व्याभिचारीभावांना रसजन्य मानीत आहे, असा एखादा पक्ष असंभवनीय नाही. ज्याप्रमाणे बीजातून वृक्ष, पाने, फुले निर्माण होतात त्याप्रमाणे सारे भावच रसातून निर्माण होतात. रस हे सर्वांचे मूळ आहे त्या आधारे भावांची व्यवस्था होते. अशी भुमिका घेणारा पक्ष नाटयशास्त्रातच उल्लेखिला गेलेला आहे. (६/३८) ह्या भुमिकेप्रमाणे अनुभावसुद्धा रसातून उत्पन्न होणार. लोल्लटाला या पक्षाचे निराकरण करावयाचे आहे काय ? असा अभिनव भारतीत उल्लेख नाही. आणि जर ह्या पक्षाचे निराकरण अभिप्रेत असेल तर मग शब्दरचना सदोष आहे. येथे विवक्षित असणारे अनुभाव रसजन्य नाहीत असे म्हणण्याच्या ऐवजी येथे विवक्षित असणारे विभाग, अनुभाव, व्यभिचारीभाव ह्यांपैकी काहीच रसजन्य नाही असे लोल्लटाने म्हटले पाहिजे. अनुभाव तेवढे रसजन्य नाहीत असे म्हटल्याने विभाव व व्यभिचारी मात्र रसजन्य आहेत असे ध्वनित होते.
लोल्लटासमोर निराकरण करण्यासाठी हा पक्ष असेल असे मला वाटत नाही. जर आपण लोल्लटाची भूमिका नीट समजून घेतली तर भावातून रस, रसातून भाव, रसभाव परस्परांतून ह्या भूमिकेचे लोल्लटाचे स्पटीकरण आपण सांगू शकतो. अभिनवगुप्त ज्याप्रमाणे तिन्ही पक्षांची संगती लावतात तशी संगती लोल्लटही लावू शकतो. म्हणून त्याला रसातून भाव, या भूमिकेचे निराकरण करण्याची गरज नाही. एक


18