पान:रससूत्र (Rasasutra).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्पष्टीकरण असे आहे की रसजन्य अनुभाव म्हणजे सिद्धी येथे जे अनुभाव उल्लेखिलेले आहेत ते सिद्धी नाहीत असे लोल्लटाला म्हणावयाचे आहे. पण हे स्पष्टीकरण पटणारे नाही. कारण प्रेक्षकांच्या ठिकाणी सिद्धीचा जो उदय दिसतो त्याला कुणीच अनुभाव म्हटलेले नाही. सिद्धीचा प्रश्न रसनिष्पत्तीच्या नंतर उपस्थित होणारा आहे. व त्यांचे आश्रय प्रेक्षक आहेत. त्या सिद्धी म्हणजे नुसते अनुभाव नव्हेत. ह्यामुळे रससूत्रातील अनुभाव हे सिद्धी नव्हेत, असे मुद्दाम सांगण्याचे कोणतेही कारण नाही.
 हे अनुभव रसजन्य नाहीत ह्या पहिल्या विधानानंतर दुसरे विधान असे आहे की ( म्हणून) त्यांची रसकारण या नात्याने गणना करता येत नाही. आता या दोन विधानांची संगती कशी लावणार ? दोन विधानांच्या मध्ये ' म्हणून ' हा मी गृहीत धरलेला आहे त्याऐवजी दोन विधानांच्या मध्ये 'कारण' हा शब्द जरी गृहीत धरला तरी विसंवाद शिल्लकच राहातो अनुभाव रसजन्य. नाहीत ( म्हणून किंवा कारण) ते रसकारण नाहीत. ही संगती आपण कशी स्वीकारणार ? जणू, जे जे रसकारण आहे ते ते रसजन्य आहे का जे रसजन्य नाही ते रसकारणही नाही, हे लोल्लटाचे मत आहे, असा भास ह्या ठिकाणी होतो. अनुभावांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी विभावांचे काय ? विभाव रसकारण म्हणून मान्य आहेत. पण त्यामुळे ते रसजन्यकसे ठरणार ? पण हा विसंवाद येथेच थांबणारा नाही. यापुढचे असे विधान आहे - की फक्त भावच रसकारण आहेत. आता जर रसकारण म्हणून गणना करण्यास फक्त भावच योग्य असतील तर मग विभावांचे रससूत्रात स्थान काय ? विभाव तर आरंभीचे . चित्तवृत्तीरूप स्थायीचे कारण सांगितलेले आहेत. विभव हे स्थायी भावाचे कारण, स्थायीभाव हे रसांचे कारण अशी संगती लावावी काय ? स्थायीभाव हे रसांचे जनक कारण आहेत असे मत लोल्लटाला अभिप्रेत असू शकत नाही. त्याचा स्थायीभाव रसजनक नसून रसच आहे. ह्या पुढच्या विधानात अनुभावांनाही चित्तवृत्ती म्हटले आहे. संस्कृत काव्यशास्त्राच्या परंपरेत सात्त्विकभाव हे भाव नसून अनुभाव आहेत असे मानणारे टीकाकार आहेत. म्हणजे भावाचा एक गट, अनुभावात ढकलणारे आहेत. पण अनुभावांनाही चित्तवृत्ती मानणारे ज्ञात ठिकाण हेच एक दिसते.

 हे उघडच आहे की ह्या ठिकाणी वाक्ये तोडण्याचा घोटाळा झालेला आहे. पण हा घोटाळा केवळ आजचा नसून जुना आहे. ह्या सर्व घोटाळ्यांचा एक परिणाम आपल्याला नाटयदर्पणात दिसतो. नाटयदर्पणकारांनी आपल्या पद्धतीने एक संगती लावली आहे. ह्या संगतीमुळे गोंधळ कमी होण्याऐवजी वाढतो कसा हे पाहणे मनोरंजक ठरेल. नाट्यदर्पणकार हे थोड्याफार फरकाने लोल्लटाचे वारसदार आहेत. त्यांच्या मते रस अनुकार्यगत म्हणजे प्रकृतिनिष्ठ आणि प्रेक्षकगत असा उभयरूप असतो. काव्यात रस, कवी आणि श्रोता ह्या दोहींच्या ठिकाणी असतो. पैकी विभाव हे अनुकार्यगत स्थायीचे कारण असतात. आणि नटांचे अनुभव हे प्रेक्षकगत रसाचे कारण असतात.


19