पान:रससूत्र (Rasasutra).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पण अभिनव भारतीत विस्तार जास्त असला तरी लोल्लटाचे प्रतिपादन पूर्वपक्ष म्हणून मांडताना ते सुसंगत मांडले गेले आहे, असेही दिसत नाही. लल्लटाला न्याय मिळालाआहे असे वाटत नाही. अडचण अशी आहे की अभिनवगुप्तांनी लोल्लटाला न्याय दिला नाही. ही तक्रारसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरच आधारावी लागते व लोलटाची भूमिका काय असावी हे सांगण्यासाठी पुन्हा अभिनवगुप्तांचाच आधार घ्यावा लागतो. लोल्लटाचे खंडन विस्ताराने शंकुकाने केले आहे. पण त्या खंडनानंतरही त्याच्या मताला अनुयायी राहिलेले दिसतात. म्हणून पुढे 'अभिनव भारतीत भट्टनायकाच्या संदर्भात असा उल्लेख आहे की " भट्टनायकाच्या खंडनामुळे लोल्लट- पक्ष निर्णायकरीत्या बाद ठरलेला आहे. तो पक्ष आता जिवंत होऊ शकणार नाही." ह्यानंतर अभिनवगुप्त होऊन जातात. इतिहास असा आहे की अभिनवगुप्त, मम्मट ह्यांच्यानंतरसुद्धा लोल्लट बाद झालेला दिसत नाही. नाटयदर्पणकार गुणचंद्ररामचंद्राच्या रूपाने थोडाफार फरक करून पुन्हा लोल्लटच आपणांसमोर उभा राहिलेला दिसतो. लोलटापूर्वी अनेक शतके उपचिती, परिपुष्टी ह्या भूमिका समीक्षकांना स्वीकाराव्याशा वाटल्या. काव्यसमीक्षा म्हणून नव्हे पण एक भूमिका म्हणून उपचितिवादाचा एक मार्मिक उल्लेख कालिदासाच्या मेघदूतात आहे. (श्लो. ११८). लोल्लटानंतर काही शतकांनी ह्या भूमिका पुन्हा स्वीकाराव्याशा वाटतातच. हे लोल्लटाचे सामर्थ्य कशात आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. ते सामर्थ्य तो पूर्वमीमांसक असण्यात नाही. त्याच्यासारखी भूमिका घेणारे विवेचक सगळेच पूर्वमीमांसक नव्हते. परंपरा असे मानते की दंडी आणि लोल्लटाची भूमिका एकच होती.. पण दंडी काही पूर्व-मीमांसक म्हणून प्रसिद्ध नाही. मुळात लोल्लटाकडे एक व्यक्ती म्हणून पाहणेच चूक आहे. ती भूमिका म्हणजे एक दीर्घजीवी परंपरा आहे. संस्कृत काव्यशास्त्रात परंपरा म्हणून पाहायचे असेल तर असे दोन लेखक आहेत. ज्या परंपरेचा एकही जुना मूळ ग्रंथ शिल्लक नाही, असा लोल्लट आहे. जी परंपरा शेवटी विजयी ठरली असा अभिनवगुप्त आहे. दोघांचीही काही सामर्थ्यस्थाने आहेत. आजही ह्या दोघांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांना आपण निर्णायक उत्तरे देऊ शकत नाही.
 अभिनवभारतीत, लोलटाची भूमिका म्हणून जो उतारा गायकवाड मालेतील नाटयशास्त्राच्या पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीत आलेला आहे, त्यात वाक्ये तोडण्याच्या बाबतीत काही त्रुटी राहिलेल्या आहेत. ह्या वाक्य तोडण्याच्या बेसावधपणामुळे अर्थ समजून घेण्यात फार मोठा अडथळा होतो म्हणून मी नोली यांचे वाचन ह्या ठिकाणापुरते स्वीकारलेले आहे. गायकवाड मालेतील अमिनवभारतीमधील उताऱ्याचे भाषांतर असे आहे. " भट्ट लोल्लट प्रभृतींनी अशा प्रकारे व्याख्या केली आहे. विभावादिकांशी स्थायीचा संयोग झाल्यामुळे रस-निष्पत्ती होते. त्यापैकी विभाव चित्तवृत्तीस्वरूप असणाऱ्या स्थायी भावांच्या उत्पत्तीचे कारण आहेत. या ठिकाणी


17