Jump to content

पान:रससूत्र (Rasasutra).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दुष्यंताच्या रतीचा साक्षात्कार होतो तो अलौकिक असतो. जगन्नाथाने असेही म्हटले आहे की लोल्लटाला निष्पत्ती शब्दाने आरोप अभिप्रेत आहे. जगन्नाथाच्या थोरवीला नमन करून हे सांगितले पाहिजे की त्याची संपूर्ण दिशाभूल झालेली असून ह्या दिशाभूलीचे कारण स्वतः मम्मट आहे.
 मम्मटाचार्य एखादा मुद्दा कमी शब्दांत अधिक रेखीवपणे व स्पष्टपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पूर्वपक्षाची मांडणी करताना ते अतिशय दक्ष असतात यात शंका नाही. पण काही बलवान पूर्वग्रहांमुळे लोल्लटाला अभिप्रेत नसणारे मुद्दे नकळत त्यांच्या मांडणीत शिरलेले आहेत. रसाचा विचार म्हणजे प्रेक्षकाच्या प्रतीतीचा साक्षात्काराचा विचार हे त्यांचे दृढ मत आहे. त्यामुळे रस प्रेक्षकांना प्रतीयमान होतो असे आपले मत लोल्लटालाही गृहीतच आहे असे ते मानतात. ही प्रतीयमानता जगन्नाथांनी साक्षत्काराच्या पातळीवर नेऊन तिच्यात अलौकिकाचा अंशही आणला आहे. लोल्लटाच्या रसकल्पनेत रस गौणपणे अनुकर्त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. त्यात अजून प्रेक्षकाचा विचार आलेला नाही. लोल्लटाच्या विवेचनात अनुभावांनी भाव गम्य होत असतील. पण ते प्रेक्षकांना गम्य होत नसून प्रकृतींना गम्य होतात. भाव प्रेक्षकांना गम्य होण्याची क्रिया अनुभावाची नसून अभिनयाची आहे. ज्या अनुसंधानबलाची चर्चा लोल्लट करतो आहे ते अनुसंधानबल नटाचे आहे, प्रेक्षकाचे नाही म्हणून अनुसंधानबलाचा अर्थ प्रेक्षकांच्या दृष्टीने आरोप अनुसंधान असा करणे योग्य नाही. आरोपवादाचे सूत्र धरून अलौकिकतावादापर्यंत जाणेही योग्य नाही. अनुभाव हे कार्य आहेत असेही लोल्लटाने म्हटलेले नाही. विभाव हे कारण व अनुभाव हे कार्य ही मांडणी संदिग्धता वाढविणारी आहे. कारण त्यामुळे विभाव हे स्थायीभावांच्या ऐवजी अनुभावांचे कारण ठरतात. विभावाची आलंबन, उद्दीपन ही विभागणी लोल्लटासमोर आहे की नाही हे सांगता येत नाही. लोल्लटाच्या विवेचनात स्थायीची पुष्टी, फक्त व्यभिचारी करीत नसून विभाव, अनुभाव, व्यभिचारी तीन घटक मिळून करतात.

 मम्मटांना लोल्लटाचा रसवितरण ग्रंथ माहीत होता की नाही हे सांगणे कठीण आहे. अभिनवगुप्तांना उपलब्ध असणारा ग्रंथ मम्मटाला अनुपलब्ध असावा याचे काहीच कारण दिसत नाही. पण मम्मट अभिनवगुप्तांना अनुसरूनच माहिती देतात म्हणून लोल्लटाच्या भूमिकेबाबत अभिनवगुप्तच प्रमाण मानावे लागतात. लोचन टीकेत अभिनवगुप्तांनी लोल्लटाचे मत फार संक्षेपाने दिले आहे. जो पूर्वावस्थेत स्थायी असतो तो व्यभिचारीदींनी परिपोष पावला म्हणजे रस होतो. हा रस अनुकार्यगत आहे. त्याचा नाटकात प्रयोग होतो म्हणून त्याला नाटयरस म्हणावे. इतकेच स्पष्टीकरण, लोचन टीकेत आहे. ह्या स्पष्टीकरणात 'रसाला नाटयरस का म्हणावे :याचा खुलासा 'एवढीच माहितीला एक जोड आहे. त्या मानाने अभिनव भारतीत विस्तार जास्त आहे.


16