पान:रससूत्र (Rasasutra).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विभावांच्यामुळे स्थायीभाव उत्पन्न होतो असे तो म्हणतो. स्थायीचा प्रारंभ आहे असे तो मानत नाही. त्याच्या नाटय विवेचनावर न्यायाचा प्रभाव नाही. त्याप्रमाणे मीमांसेचाही प्रभाव नाही. लोल्लटाचे शब्द-शक्तीविषयीचे विवेचनही उपलब्ध नाही. मग तो कुमारिल भट्टाचा अनुयायी आहे की प्रभाकर मतानुयायी आहे हे कसे सांगणार ? आज आपणासमोर लोल्लटाचे जे विवेचन उपलब्ध आहे ते पाहाता त्याच्या दर्शनाचा कोणताही अंदाज बांधणे शक्य नाही. तरीही एका अर्थी, तो मीमांसक आहे. प्राचीन भाष्यकाराच्या परंपरेत भाष्यकाराच्या दोन पद्धती मानल्या जातात. एखादे सोईस्कर वचन घेऊन तर्कशास्त्राच्या आधारे स्वतःची भूमिका प्रतिपादन करणारे न्यायपरंपरेचे भाष्यकार मानले जातात. शंकुक-भट्ट नायक यांचे विवेचन ह्या प्रकारचे आहे. ह्या परंपरेचे भाष्यकार चर्चेला आधारभूत वचन सोडल्यास उरलेल्या ग्रंथात आपल्याला प्रतिकूल काय आहे त्याचा फारसा विचार करीत नाहीत. संपूर्ण ग्रंथ विचारार्थ घेऊन त्यातील सर्व वचनांची संगती लावून देणारे व ही संगती लावताना स्वमत प्रतिपादन करणारे काहीजण असतात. हे मीमांसा परंपरेचे भाष्यकार मानले जातात. लोल्लट पूर्व मीमांसक होता का नाही. हे सांगता येत नाही. तो मीमांसक ह्या अर्थाने मात्र आहे, की नाट्यशास्त्रातील सर्व वचनांची संगती लावण्याचा प्रयत्न त्याने कसोशीने केला आहे आणि मूळ ग्रंथाला जास्तीत जास्त प्रामाणिक राहाण्याची त्याची धडपड आहे. स्वतः अभिनवगुप्तही मीमांसा परंपरेचे भाष्यकार आहेत. स्वतःच्या दर्शनाचा कमीत कमी आग्रह असणारा मीमांसा परंपरेचा, नाटयशास्त्राचा आद्य भाष्यकार म्हणून भट्ट लोल्लट महत्त्वाचा आहे. लोल्लटाच्या भूमिकेची मांडणी करताना ती नेहमी मम्मटाच्या स्पष्टीकरणाच्या आधारे करण्यात येते. काव्यप्रकाशात मम्मटांनी ही मांडणी अशी केली आहे. " ललनादि आलंवन-विभावांच्या आणि उद्यानादि उद्दीपन-विभावांच्या कारणाने रत्यादिक स्थायीभाव उत्पन्न होतात. कटाक्ष, भुजाक्षेप इत्यादी अनुभावांच्या योगाने स्थायीभाव प्रतीतियोग्य केले जातात. निवेंदादी व्यभिचारी भावाच्यामुळे स्थायीभाव उपचित म्हणजे पुष्ट होतात. हा पुष्ट स्थायीभाव म्हणजे रस. रस, मुख्य वृत्तीने रामादि अनुकार्याच्या ठिकाणी असतो. त्या रूपाचे अनुसंधान केल्यामुळे नर्तकाच्या ठिकाणी रस प्रतीयमान होतो. ह्यापैकी विभाव कारण आहेत, अनुभाव कार्य आहेत आणि व्यभिचारी भाव हे सहकारी आहेत." लोल्लट मीमांसक असल्याचा उल्लेख काव्यप्रकाशात नाही. थोड्याफार शब्दाचे न्यूनाधिक्य करून हाच आशय लोल्लटाचे मत सांगताना प्रतिपादन केलेला असतो. जगन्नाथ पंडितांनी लोल्लट स्पष्ट करताना मम्मटापेक्षा काही निराळा बारकावा दाखविलेला आहे. जगन्नाथाच्या मते प्रेक्षक नटावर, दुष्यंताचा आरोप करतात. हा आरोप करताना प्रेक्षकांना समोर असणारा जो नट त्याच्यातला रतीचा साक्षात्कार होतो तो लौकिक असतो व आरोपित

15