पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अश्रूत विरघळलेला आचार्य याला शेवटी काकाजीच्या कवेतच आश्रय मिळतो.

विनोदी नाटक - गंभीर कथानक
  'तुझे आहे तुजपाशी' या तुफान विनोदी नाटकाचे कथानक इतके गंभीर आहे. मानवतेने निर्माण केलेली मूल्ये हीच ज्या वेळी माणुसकीला पारखी करणारी चौकट ठरू लागतात त्या वेळी माणसाचे माणूसपण निर्माण करणारी मूल्ये आणि माणूसपण यांचाच झगडा सुरू होतो. ध्येयवाद, त्याग, वैराग्य, चारित्र्य, प्रामाणिकपणा या बाबी व्यर्थ आहेत असे कुणीच म्हणणार नाहीत; पण हसत हसत फासावर चढणाऱ्याने हे समजून घेतले पाहिजे की त्याचे हे अमानुष बलिदान इतरांचा मानवीपणा विकसित करण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी असते. या विनोदी नाटकातील अत्यंत गंभीर असणारी अशी ही समस्या आहे आणि तरीही हे नाटक विनोदी म्हणून यशस्वी होते. हे नाटक पाहताना पुनः पुन्हा विचारला पाहिजे तो प्रश्न हा की इथे आपण कशाला हसतो आहो? देशातील चव्वेचाळीस कोटी लोकांना अंगरखा मिळाल्याखेरीज मी अंगरखा घालणार नाही या अट्टहासाने अर्धनग्न राहणाऱ्या गांधींच्या भाबडेपणाला आपण हसतो आहोत काय? तसे असेल तर जीवनाला प्रेरक ठरलेल्या सर्वच महात्म्यांत थोडाफार अतिरेक आढळतो. गतीच्या मूलस्रोतालाच आपणाला हास्यास्पद ठरवावे लागेल. खरी गोष्ट अशी आहे की हे नाटक पाहत असताना एकाच वेळी आपण हसत आहोत आणि अंतर्मुख होत आहोत हे लक्षात येते. एकाच वेळी आचार्यांच्याबद्दल आपल्या मनात राग आणि कीव, आदर आणि तुच्छता उसळत असतात. मानवी जीवनातील मूलभूत समस्येला हात घालणारे, पात्रांचा गंभीर सहानुभूतीपूर्वक उठाव करणारे, कारुण्य आणि वेदना यांत चिंब भिजलेले, माणसांना हास्यास्पद न करणारे, तरीही तुफान विनोदी म्हणून गाजणारे इतके भावस्पर्शी नाटक निदान मराठीत तरी दुसरे कोणते दाखवावे?
  गंभीर शोकांतिका मराठीत आहेत. फार्स आणि खळाळणारा विनोद मराठीत आहे, पण कारुण्य ज्या ठिकाणी स्वतःच्या दर्शनाने एकाच ठिकाणी, क्षणी ओठांवर स्मित आणि डोळ्यांत आसू उभे करील हा विनोद इथेच आहे. या नाटकातील पु. लं.च्या विनोदाची जात ही अशी आहे. ही कलाकृती निर्दोष आहे असे नाही. उलट ती मांडणीत राकट व ओबडधोबड आहे, पण म्हणूनच तिच्यात

९६ / रंगविमर्श