पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काकाजी
  आणि ताणाचा दुसरा खांब काकाजी कसा आहे? काकाजीच्या ठिकाणी रसिकता आहे याचा अर्थ तो उथळ आहे असा नाही. जीवनातील आनंद आणि दुःख यांची आकंठ चव चाखीत हा माणूस आपल्या तृप्तीत स्थिर झालेला आहे. तृप्त व्यक्तित्वाचा दिलदारपणा, उदार समंजसपणा हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे, नव्हे, गाभा आहे. म्हणून जीवनातील भीषण अगर गंभीर वास्तवाला तो पारखा नाही. सुरांच्या मस्तीत रंगलेल्या गायिका प्राणाचे भय गुंडाळून ठेवून नपांचा अव्हेर करू शकतात, हा कलास्वादाचा बेभान गंभीरपणा काकाजीने ओळखला आहे. शिकार करताना दहांचा पोशिंदा काळवीट जेव्हा कोसळून खाली पडतो, त्या काळवीटाला शिंगांचा आधार देऊन उभे करणाऱ्या हरिणींची एकनिष्ठ प्रीती आणि तिची व्यर्थता याचा विद्ध करणारा अनुभव काकाजीने घेतला आहे. जीवनाचा प्रामाणिकपणे आस्वाद घेता घेता मोह आणि लिप्ताळा या क्षुद्रत्वाच्या पलीकडे गेलेला माणूस म्हणजे काकाजी. सर्व षोक करून विरक्त झालेला प्रसन्न, समाधानी, तटस्थ साक्षी असणारा आणि तरीही सर्वांच्यावर मायेची पाखर घालणारा असा हा माणूस आहे. स्थितप्रज्ञ कसा असतो या प्रश्नाला काकाजी उत्तर देतो, "स्थितप्रज्ञ हा त्या समोरच्या गाढवासारखा असतो. नीती-अनीतीला पारखा जनावरही असतो." पण नीती-अनीती व्यापून त्याच्या पलीकडे गेलेला माणूस कसा असतो? काकाजीने कबूल केले नाही; पण तो काकाजीसारखा असतो. विनोदाचा दुसरा खांब इतका भव्य आणि उदार आहे.

उषा आणि गीता
  उरलेल्या नाटकात उषा आणि गीता यांची कहाणी म्हणजे पुन्हा दुःखाचीच कहाणी आहे. एकीने ध्येयवादित्वाच्या कल्पनेने दुःख स्वतःवर लादलेले आहे, दुसरीवर देशभक्ताची मुलगी म्हणून ते लादण्यात आले आहे. या नाटकात स्वाभाविक प्रवृत्तींच्या विरुद्ध उषा आणि आचार्य स्वतःच्याच विरुद्ध झगडतात. गीता तिच्यावर लादण्यात आलेल्या चौकटीतून डोके वर काढण्यासाठी झटते आणि ज्या वेळी काकाजीच्या रूपाने साकार झालेल्या समृद्ध जीवनाच्या सार्वभौमत्वासमोर सारी पत्रे नत होतात त्या वेळी काकाजी सांगतात, “आम्ही आज सूत काढले. यार त्यातही मजा असतो." आपले करुण निवेदन देताना

पु.ल. देशपांडे / ९५