पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विनोद कसा शक्य आहे ? या नाटकात हास्यास्पद कोण ठरतो हाच खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्या ठरीव समजुतीप्रमाणे विनोदी पात्रांना जीवनाची प्रामाणिक, गंभीर व भरीव बैठक असू नये, या समजुतीला पहिला तडा गडकऱ्यांचे तळीराम हे पात्र देते. अकुंठित बुद्धिवैभव, प्रसंगावधान व सुसंगत भूमिका असणारे हे एक धारदार व अश्रद्ध पात्र आहे. आपल्या घोर अश्रद्धेमुळे तळीराम जीवनातील मूल्यांनाच पारखा होऊन गेला आहे, पण पु. लं. चा आचार्य किंवा काकाजी यांची जडणघडण यापेक्षा निराळी आहे.

आचार्य
  आचार्य या पात्राविषयी आपण फार तर असे म्हणू शकू की, हा माणूस संयमाच्या आणि वैराग्याच्या कठोर कल्पनांच्यामुळे जीवनातील रसिकतेला पारखा झालेला आहे. पण आचार्यांच्याही जीवनाला स्वेच्छापूर्वक स्वीकारलेल्या वैराग्याची, त्यागाची व चारित्र्याची पार्श्वभूमी आहे. आचार्य आणि त्यांची जीवनदृष्टी कुणाला चुकीची वाटेल, पण ती उथळ खासच नाही. हा माणूस ढोंगी, अप्रामाणिक असा नाही. जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या मूल्यांचे ओझे कधी कधी याला पेलत नाही. चारित्र्याच्या प्रवाहात पोहताना कधी कधी हात थकतात आणि मग कुठे तरी विरंगुळ्याचा काठ धरावा असे वाटू लागते. कारण आचार्य हाही तुमच्या-आमच्यासारखा हाडामासांचा माणूस आहे. ज्याच्याजवळ पुरुषत्वच नाही अशा तृतीय प्रकृतीच्या माणसाचे ब्रह्मचर्य कदाचित बिनधोक असेल, पण उसळणारे तारुण्य देशाच्या चरणी अर्पण करण्यासाठी ज्यांनी स्वतःला वैराग्याच्या पिंजऱ्यात अडकून धरले त्यांचे जीवन हा एक सतत चालणारा संघर्ष असतो. कधी कधी ओझे वाटणारे हे मोठेपण फेकून देऊन माणूस एक सामान्य मानव म्हणून मोकळा श्वास घेण्यासाठी धडपडतो आणि पुन्हा दुप्पट जोराने स्वतःला कोंडून घेतो. मागे पडू नये म्हणून कुठल्यातरी धडपडीचे तंत्र मागे लावून घेतो. आचार्यांच्या शैलीत असणारा इतरांच्या विषयीच्या तुच्छतेचा दर्प आणि त्याचा चाललेला नियमांचा आग्रह हा खरोखरी आतून कोसळत आलेले स्वतःचे दुबळे व्यक्तिमत्त्वच झाकण्याचा प्रयत्न आहे. या नाटकातील विनोदाचा एक खांब इतका कर्मनिष्ठ त्यागी आणि तरीही अनुकंपनीय आहे.

९४ / रंगविमर्श