पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐकत असताना कणवेचा एक थेंब डोळ्यांत जमू लागतो आणि आपल्या दारिद्र्यावरचे विदारक भाष्य जेव्हा अंतू सांगू लागतो त्या वेळी हा थेंब वाफ होऊन उडून जातो. 'व्यक्ती आणि वल्ली'तील सर्वच व्यक्तिरेखा वाचताना हा अनुभव येतो असे नाही, पण जे अन्तू बर्व्यात साधले आहे ते इतरत्र बोटातून निसटून गेले ही जाणीव पु. लं.ना कितीदा असते हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या 'सांत्वन' सारख्या एकांकिकेत विनोदाचा हा पापुद्रा अगदी विरविरीत दिसू लागतो आणि मग सर्व प्रतिष्ठा आणि सुख यांनी घेरलेल्या माणसाचे गुदमरून गेलेले दृष्य त्या ठिकाणी साकार होऊ लागते. 'सांत्वन' मधील चित्रण वेदनेच्या बाजूला थोडे अधिक झुकले आहे असे आपण म्हण शकू. तर 'असा मी असा मी'तील चित्रण उथळ हास्याकडे फारच झुकले वा कलले आहे असे आपण म्हणू. अन्तू बर्वा काही जणांना एकदम स्थूल वाटू शकेल. पु. लं.नी निर्माण केलेल्या कलाकृतींच्या यशापयशाविषयी मतभेद होऊ शकतील; पण या ठिकाणी सहानुभूतीच्या कवडशात थरथरणारा अश्रू हाच विनोद म्हणून उभा करण्याचा एक विलक्षण नाजूक प्रयोग घडतो आहे यावर फारसा मतभेद होणार नाही. अशा विनोदाचे आकलन प्रामुख्याने भावनिक असते व ते एकदम माणुसकीच्या गाभ्याजवळ नेते असा माझा मुद्दा आहे. पु. लं.नी केलेल्या या प्रयोगाकडे त्यांना विनोदकार म्हणताना फारसे लक्ष कधी जातच नाही.

तुझे आहे तुजपाशी
  पु. लं. चा हा विनोद आपल्या सर्व राकट, बटबटीत, ओबडधोबड पण विलक्षण जिवंत स्वरूपात त्यांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात साकार झाला आहे. मराठी टीकाकारांनी या नाटकाचा वेध घेताना पुनः पुन्हा चक्कर खाल्ली आहे. विनोदी नाटक म्हणून या नाटकाकडे पाहू लागलो म्हणजे शेवटच्या अंकातील आचार्यांचे करुण निवेदन विलक्षण रसभंगकारक वाटू लागते आणि गंभीर नाटक म्हणून या नाटकाकडे पाहण्याची तर सोय नाही. कारण गंभीर नाटकातील पात्रे इथे कुठे शोधावीत? आरंभीच्या दोन अंकांत सतत उसळणारी हास्याची कारंजी या नाटकाला गंभीर म्हणून पाहूच देत नाहीत आणि मग पु. लं.च्या नाटकाकडे कसे पाहावे हेच समजू शकत नाही.
  विनोदाच्या ठरीव पद्धतीने पाहायचे तर कुणीतरी हास्यास्पद ठरल्याशिवाय

पु.ल.देशपांडे / ९३