पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाता जाता ज्या वेळी माणूस यंत्रच होऊ लागतो, त्याचे जीवन पोकळ होऊ लागते आणि निवडुंगाला कॅक्टस म्हणून कुंडीत जपण्याची व त्या आधारे आपली कलाप्रीती दाखवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा या माणसाला थोडे थांब. या पळण्याच्या घाईत सर्वस्वी पोकळ यंत्र आणि माणुसकीला पारखा होऊ नको' असे सांगावे लागते. पु. लं. च्या विनोदाला यामुळे सनातनीपणाची झाक येते असाही आक्षेप कधी कधी ऐकू येतो; पण पुढे जाणे अगर थांबणे या दोन्हींचाही हेतू माणसाच्या स्वाभाविकपणाला असणारे अडथळे दूर करणे इतकाच आहे हे ध्यानात घेतल्यावर सनातनित्वाचा आक्षेप अनाठायी वाटू लागतो. पण खरे म्हणजे शिष्टाचारांच्या विळख्यात जे गुदमरणे आहे ते आक्रंदन पु. लं. च्या विनोदातून मिष्किलपणे साकार होत असते. याहीपेक्षा खोल जाण्याची शक्ती पु. लं. च्या ठिकाणी आहे. वेदनेच्या तळ्यावर मधूनच लाटा उसळाव्यात तसे । त्यांच्या विनोदाचे स्वरूप काही ठिकाणी दिसते.

दुःखाचे चित्रण
  असा लेखक दुःखाचे चित्रणही फार सामर्थ्याने करीत असतो. यापूर्वी मराठीत हा चमत्कार गडकऱ्यांनी करून दाखविला आहे. उत्कट दुःख आणि हास्याचा खळखळाट सारख्याच सामर्थ्याने गडकऱ्यांच्या नाटकांतून दिसू लागतो. हा पाहून आपण फार तर असे म्हणू की गडकरी ढसढसा रडवू शकत होते आणि खदखदा हसवू शकत होते. दुःख आणि हसू यांचे प्रांत जीवनात इतके वेगळे नाहीत. ज्या ठिकाणी हसणे आणि रडणे या दोन्ही गोष्टी एकच होऊन जातात तिथे आपण जीवनाच्या आकलनात अधिक खोलवर जाऊन पोचलेलो असतो. कधी यातील हास्याचा पापुद्रा एकदम विरळ होऊन जातो आणि मग दुःखाचा सूक्ष्म पण उत्कट आविष्कार प्रभावीपणे जाणवू लागतो. व्यक्ती आणि वल्लीतील 'अन्तू बर्वा' सारखी व्यक्तिरेखा अशी आहे. या व्यक्तिरेखेचा आस्वाद घेताना आपण हसतो आहोत की विषण्ण होतो आहोत, भाबडे प्रेम पाहताना आपण हळुवार होत आहोत की अन्तू बर्व्याची आविष्कारशैली पाहताना आपण 'सिनिकल' होत आहोत हे कळणेच कठीण होऊन जाते. हसता हसताच एकाक्षणी आपल्याला हे लक्षात येते की, आपण हसत नव्हतोच. आपण हा माणूस पाहून सुन होत होतो. अंतूची जीवनगाथा

९२ / रंगविमर्श