पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. माझी मुख्य तक्रार आपल्या नानाविध घाईगर्दीत पु. ल. हे स्वतः पु. ल.च होण्याचे टाळत आहेत, ही आहे. स्थळकाळाने आणि समाजाने, रूढींनी बंदिस्त केलेला असा माणूस असतोच; पण याच्यापलीकडे माणसाचे माणूसपण दडलेले असते. रूढींनी निर्माण झालेली परिहार्य मानवी दुःखे, वेदना असतातच; पण माणसाच्या माणूसपणामुळेच निर्माण झालेली दुःखे ही अधिक खोल व थक्क करणारी असतात. वेदनेचा हा मूलकंद जसा माणूसपणाच्या गाभ्यापर्यंत जाऊन भिडलेला असतो तिथेच हास्याचाही मुलकंद जाऊन भिडला पाहिजे. भावनेच्या पातळीवर विषण्ण होणे, सुन्न होणे हे जसे माणसांनाच शक्य आहे तसे हसणेही माणसांनाच शक्य आहे. जनावरांच्यासाठी 'Pain' आहे पण 'Sorrow' नाही आणि 'Pleasure' आहे पण 'Laughter' नाही. माणसाच्या माणूसपणाच्या साक्षीदार असणाऱ्या या मूलभूत ठिकाणापर्यंत जेव्हा विनोद जातो त्या वेळी तो वेदनेत, अनुकंपेत भिजून चिंब झालेला असतो. सहानुभूती, हळुवारपणा, दुःख, अनुकंपा, कीव ही ज्या विनोदाचा पाया आहे त्याचे स्वरूप मग केवळ बौद्धिक राहत नाही; ते तर्काची दारे ओलांडून आत्म्याइतके खोल जाते आणि वेदनेच्या दर्शनाप्रमाणेच एकाच वेळी माणसाला उल्हसितही करते आणि गुदमरूनही टाकते. मराठीला अनोखी असणारी विनोदाची ही पातळी पहिल्यांदा पु. लं.नी गाठली. या पातळीवर स्थिर होणे त्यांना जमत नाही; किंबहुना हे करणे त्यांना मनापासून फारसे महत्त्वाचे वाटत नाही, अशी माझी तक्रार आहे. या आपल्या हक्काच्या वैभवासाठी जागेवर पाय रोवून घट्ट उभे राहण्याइतकी पु. ल. स्थिरताच दाखवायला तयार नाहीत. त्यामुळेच त्यांचा चौरसपणा त्यांचा शत्रू होईल की काय, व्यापकपणा कुंपण होईल की काय अशी मला भीती वाटते.

शिष्टाचाराच्या विळख्यातले गुदमरणे हाच विनोद
  पु. लं. चा मराठीत विनोदकार म्हणून गौरव होत असताना त्या विनोदाचे हे स्वरूप प्रायः कुणी लक्षात घेत नाही. कुठलाही विनोदकार चमकदार बुद्धीचा आणि मिष्किल असतो. तसा बौद्धिक चमकदारपणा व मिष्किलपणा पु. लं.च्या जवळ आहे; पण कोल्हटकरांच्या विनोदाचा रोख अंधःश्रद्धांनी जखडलेल्या समाजाला परंपरांची हास्यास्पदता दाखविण्याकडे होता. एका दृष्टीने त्या विनोदाचे प्रयोजन पुढे नेणे असे होते. पु. लं. चा विनोद यापेक्षा निराळा आहे. पुढे

पु.ल. देशपांडे / ९१