पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गौरव हाच शत्रू
  महाराष्ट्राचे विनोदकार म्हणून सर्वत्र पु. लं. चा गौरव होत असतो. हा गौरवच या माणसाचा शत्रू ठरेल की काय अशी मला भीती आहे. मराठीतील विनोदाची परंपरा प्रामुख्याने बौद्धिक व रूक्ष आहे. न आवडणाऱ्या समाजविघातक घटनेची विविध प्रकारे चेष्टा करणे, टर उडविणे, रूढींना हास्यास्पद करून टाकणे किंवा दाखविणे असे आरंभीच्या मराठी विनोदाचे स्वरूप आहे. विनोद कोटीनिष्ठ असो, प्रसंगनिष्ठ असो की स्वभावनिष्ठ असो हास्यास्पद करून दाखविणे या जिद्दीची मर्यादा विनोदाला पडली आहे. कोल्हटकरांच्या सारख्या विनोदकाराच्या लिखाणात आपण हिंदूसमाजातील रूढींना हसतो. गडकरी आणि चि. वि. जोशी यांचा विनोद पाहत असताना आपण फजित झालेल्या, बावळट ठरलेल्या माणसाला हसत राहतो. कधी कधी एखाद्या कोटीमुळे लक्कन जाणवणाऱ्या विसंगतीकडे पाहून आपण हसतो; पण विनोदाची ही सारी रूपे स्थल-काल-समाजाने बद्ध केलेली आणि बौद्धिक रूपे आहेत. पु. लं.च्या लिखाणातील पुष्कळसा विनोद असाच आहे. चि. वि. जोशी, गडकरी, कोल्हटकर, वि. मा. दि. पटवर्धन यांच्या विनोदाची सर्व सामर्थे पु. लं.च्या ठिकाणी एकत्रित दिसू लागतात. या अर्थाने पाहिले म्हणजे मराठीतील विनोदाच्या मागच्या सर्व परंपरांचा पु. लं.च्या ठिकाणी समुच्चयाने आढळ दिसून येतो, पण असे असूनही चि. वि. जोशी किंवा कोल्हटकर यांच्या विनोदाला जो भरघोसपणा आहे, तसा पु. लं.च्या विनोदाला प्राप्त झालेला दिसून येत नाही. सुटे सुटे हसण्याजोगे प्रसंग एकजीव होऊन त्यातून विनोदाचा एक सलग पट उमलावा लागतो तसा सलगपणा अजून पु. ल.त नाही. त्यांच्या विनोदाचे स्वरूप अजनही फुटकळ आहे. हा सलगपणा न जाणवण्याचे कारण लेखकाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अविछिन्न असणारी संगती अजून पु. लं.ना साधलेली नाही; या ठिकाणी आढळेल असे मला वाटते.

पु. ल. हे पु. ल. होण्याचे टाळत आहेत
  पण माझी खरी तक्रार ही नाही. पु. ल. देशपांडे यांना चि. वि. जोशी, कोल्हटकर होता आले असते; पण तसे ते झाले नाहीत ही खरोखरी तक्रारच नव्हे. कारण पु. लं. नी कोल्हटकर, चि. वि. जोशी व्हावे अशी आमची इच्छाच

९० / रंगविमर्श