पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग फार क्वचित जुळणारा असतो. इतरांच्या क्षेत्रांत पु. लं.चा शिरकाव आहे तसे त्यांचे स्वतःचे एक खास क्षेत्र आहे. एकपात्री प्रयोग सौ. मुळगावकरही करतात; पण ‘बटाट्याची चाळ'ला जे प्रायोगिक आणि कलात्मक यश आले त्याला महाराष्ट्रात तर दुसरी तोड सापडणे कठीण आहे. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे वाकडे आहे असे म्हणतात. व्यवहारी न होता व्यवहार सांभाळणे, अस्मिता न सोडता धन पायाशी खेचून आणणे आणि जीवनाचा रसिक आस्वाद घेऊन कंटाळण्याचे निमित्त सांगून गर्दीत चालणारे एकपात्री प्रयोग बंद करणे हे भाग्य मराठीत फक्त पु. लं. नाच मिळाले. छापलेल्या कथा केवळ वाचून दाखविण्यासाठी हजार रुपये मागणारे जसे पुल.च, तसे चाळीस हजार रुपये रक्तपेढीला देऊन मराठी साहित्यिकांचा साहित्य सेवेवर घडलेल्या दानाचा उच्चांक निर्माण करणारे पुन्हा पु.ल.च !
  याखेरीज ते साहित्यिक आहेत. नाटके, एकांकिका, विनोदी लेख, व्यक्तिरेखा, प्रवासवर्णने आणि गप्पाशप्पा हा पसारा तर आहेत; बाजूला विविध विषयांवर त्यांचे फुलणारे वक्तृत्त्व आहे. इतिहास-संशोधनापासून सेवादलापर्यंत आणि चित्रकलेपासून रक्तपेढीपर्यंत जागृत नागरिकांची सर्व कर्तव्ये सांभाळणारे, ज्ञानाविषयी आस्था असणारे आणि कलांची आस्था असणारे चौरसपण पु. लं. ना लाभलेले आहे. याबाबत त्यांच्याशी तुलना करता येईल असा दुसरा माणूस सापडणे फार कठीण.


पु. लं. भोवतीचे कुंपण
  एवढा मोठा चौरसपणा माणसाचा व्याप वाढवतो, आवाका वाढवतो तसाच त्याच्या मर्यादाही निर्माण करतो. पु. लं. ना. आता अशा मर्यादा निश्चित पडलेल्या आहेत. या मर्यांदाच्यावर मात करण्याची फार मोठी सुप्त शक्ती त्यांच्याजवळ आहे, हे खरे असले तरी ठिकठिकाणी पडलेल्या मर्यादा ओलांडण्याची जिद्द आणि इच्छा त्यांच्याजवळ किती आहे हाच एक महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. नानाविध वाटांनी फुलणारे विस्तृत व्यक्तिमत्त्व हेच आता पु. लं.च्या भोवती कुंपण होऊन बसले आहे. या कुंपणावरून किती वेळा बाहेर उडी घेणे पु. लं. ना जमेल याचे उत्तर त्यांनी स्वतः द्यायचे आहे.

पु.ल.देशपांडे / ८९