पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण ६ वे





पु. ल. देशपांडे



 आमचे मित्र पु. ल. देशपांडे हे मराठी जीवनातील एक दृष्ट लागण्यासारखे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमा उद्योगात पु. ल. ज्या वेळी शिरले त्या वेळी क्रमाने 'ऑल राउंडर' होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते नट होते, दिग्दर्शक होते, पटकथा-लेखक, संवादलेखक, गीतकार, संगीत-दिग्दर्शक अशा नानाविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शेवटी 'गुळाचा गणपती' सारखा एक चित्रपट तर असा आहे की ज्याचे नायक, दिग्दर्शक, पटकथालेखक असे अनेक विभाग एकट्याने सांभाळून पु. लं. नी एकखांबी तंबू तयार केला.

प्रतिभेचा चौरसपणा
  नाटकाच्या क्षेत्रात ते पुन्हा नाटककार, नट, कुशल दिग्दर्शक या सर्व भूमिकांतून चमकलेले आहेत. पडदे ओढणारा आणि प्रॉम्प्टरपासून नाटककार आणि प्रमुख नट इथपर्यंत त्यांचा संचार चालतो.
  संगीताच्या क्षेत्राशी पु. लं. चा घनिष्ठ संबंध आहे. गायनाचा क्लास कोण्या एकेकाळी त्यांच्या चरितार्थाचा विषय होता. गायनातील नानाविध बारकावे, हरकती त्यांच्या हातात व गळ्यात मुरलेल्या आहेत. संगीताचा विवेचक अभ्यासही त्यांनी बराच केला आहे. यादृष्टीने श्री. मारुलकर यांच्या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना पाहण्याजोगी आहे.
 रेडिओ आणि टेलिव्हिजन यांचेही तज्ज्ञ म्हणून पु. लं. कडे पाहिले जाते. ते कलावंत आहेत तसेच हाडाचे रसिक आहेत. केशवराव भोळे, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख त्यांच्या अस्सल रसिकतेची साक्ष पटवतील. हाडाचा कलावंत आणि तितकाच दिलदार रसिक हा

८८ / रंगविमर्श