पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या जीवनाचा सर्वांगीण अधःपात दाखवताना गडकऱ्यांनी सर्वतोपरी श्रद्धाशून्य झालेल्या तळीरामची पार्श्वभूमी वापरली आहे. यामुळे तर नाटकाच्या भीषणतेत अधिक भर पडते. विनोदाचा थिल्लरपणा निर्माण होत नाही. सारे आर्य मंदिरामंडळ असेच आहे. खुदाबक्ष व शास्त्रीबुवा परस्परांच्या गळ्याला मिठ्या मारतात आणि तळीरामच्या प्रेताला साक्षी ठेवून तो जिवंत असल्याबद्दल त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मान्य करतात. या नाटकात वैद्य व डॉक्टर मिळून रोग्याचा ताबडतोब मुडदा पाडून दाखवण्याची प्रतिज्ञा करतात. अशी या विनोदाची प्रत आहे. बऱ्यावाईट साऱ्याच घटनांना तुच्छतेने हसणारा तळीराम पडद्यावर लटकवलेल्या, दात विचकून भेसूर हसणाऱ्या भुताच्या मुखवट्यासारखा आहे. या पार्श्वभूमीवर उत्तमाची होळी चालू असते, ते जळत असतात व मध्यमांची निरर्थक उपयोगशून्य पोपटपंची चाललेली असते. त्यांच्यातील काहींचे संसार नव्याने जमत असतात. एरिक एरिया रेमार्कने कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या पार्श्वभूमीवर आल्यासारखे जगतानासुद्धा माणसे एका बाजूला शिळा ब्रेड चघळतात, पाठीवरच्या आसुडांच्या घावांवर भिजलेला टॉवेल ठेवतानाच शेजारच्या मुलीला डोळाही घालतात याचे वर्णन केले आहे. या वर्णनाने जशी भीषणतेत अधिक भर पडते त्या प्रकारचीच भर ‘एकच प्याला' नाटकातल्या आर्यमदिरामंडळ व तळीराममुळे पडते. म्हणूनच एकच प्याला नाटक पाहताना माणूस सुत्र होऊन जातो. यातच या नाटकाचे यश आहे असे मला वाटते.

नाटककार गडकरी :एक आकलन/८७