पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे वर्णन करता येणार नाही. म्हणून या नाटकाची गंभीर प्रकृती, या नाटकात झालेला सुधाकरांसारख्या उमद्या मानवाचा सर्वनाश, त्याची पतिनिष्ठ पत्नी व तिचा झालेला दारूण शेवट; सुधाकराची बौद्धिक शक्ती हे सारे मान्य करूनही गडकरी मराठीचे शेक्सपियर ठरत नाहीत. “एकच प्याला' ही अस्सल शोकात्मिका, मराठीतील सर्वोत्कृष्ट शोकात्मिका इथपर्यंत येऊनच थांबले पाहिजे. श्रेष्ठ शोकात्मिका पाहताना नायकाच्या स्वभावजन्य वैगुण्यातून त्याचा विनाश उद्भवतो याचा प्रत्यय आला पाहिजे. सुधाकर अफाट कर्तृत्वाचा मानी पुरुष आहे हे या नाटकात सांगितले गेले आहे, पण नाटकभर त्याच्या उग्र आग्रहीपणाखेरीज कशाचाही प्रत्यय येत नाही. पहिल्या अंकातील सुधाकर रामलालची स्तुतिस्तोत्रे गाणारा, सिंधूची चेष्टा करणारा तृप्त पण कृतज्ञ आहे. सुधाकरांजवळ ज्या तोलामोलाचे वक्तृत्व आहे त्या तोलामोलाचे कर्तृत्व अगर त्या तोलामोलाचे विचारवैभव नाही. किंबहुना त्याच्या बुद्धीचा वकूब तळीरामपेक्षाही थिटा वाटतो. सिंधूला या नाटकाची नायिका मानावे असा तिच्या अंतरंगाचा क्षोभ कुठेच दिसत नाही. क्षीरसागरांनी आपल्या विवेचनात या नाटकाच्या या मर्यादांची नोंद केली आहे.

विनोदाचे स्थान'
  काहीजणांना या नाटकातील विनोद बराच बोचतो. या गंभीर नाटकाला विनोदाचे ठिगळ नसते तर बरे झाले असते असे त्यांना वाटते. खरोखरी या नाटकातील विनोद असा फारसा नाही. जीवनातल्या सर्वच मूल्यांवरील श्रद्धा ढासळून गेलेल्या आहेत असे तळीरामचे पात्र म्हणजे विनोदी पात्र नव्हे. तळीरामला जुने मंत्रविवाह मान्य नाहीत. नवे प्रेमविवाह मान्य नाहीत. त्याला मळात प्रीती या नाजूक भावनेचे अस्तित्वच मान्य नाही. प्रेमाने मदिराक्षी मिळते तर मदिरेने माणूस स्वतःच मदिराक्ष होतो हे त्याच्यामते बाईपेक्षा बाटली श्रेष्ठ ठरण्याचे बिनतोड कारण आहे. जन्मदात्या आई-वडिलांचे फोटो चार आण्यांना विकून टाकतो आणि देवादिकांचे फोटो दोन आण्यात मिळतात हा पुरावा पुढे करून आपला व्यवहार देवापेक्षा मातापित्याचा सन्मान दुप्पट ठरवणारा आहे असा आग्रह धरतो. जीवनातील सर्व सुखांच्या उपभोगाला ज्याचा प्रारंभ झाला आहे, ज्याच्या जीवनात अपत्यरूपाने नव्या उल्हासाचे कोंभ उगवत आहेत

८६/रंगविमर्श