पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे पहिला प्याला घेण्याच्या आधी. अशी भूमिका मांडण्याचे त्यांनी ठरवले. पहिल्या प्यालाला जोड म्हणून गडकऱ्यांनी पहिला स्पर्श आणून बसवला. या स्पर्शासाठी एक स्त्रीपात्र हवे म्हणून शरद आली. अशा क्रमाने कोल्हटकरी वळणांनी नाटकाचा आराखडा मनात तयार झाला, पण प्रत्यक्षात जेव्हा नाटक लिहून झाले त्या वेळी ते गडकरी संप्रदायापेक्षा अगदी वेगळ्या त-हेचे नाटक तयार झाले. भव्य शोकात्मिका लिहिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भव्य काव्यात्मकतेची, समर्थ शैलीची व भव्यतेला स्पर्श करू शकणाऱ्या स्वभावरेखनाची जोड हवी असते. गडकऱ्यांच्या ठिकाणी या साऱ्यांचा समन्वय झाला होता. म्हणूनच ते मराठीतील एक अलौकिक नाटक लिहून गेले.
  जे नाटक गडकरी दारूविरुद्ध म्हणून लिहून गेले त्या नाटकातील नायकाला- सुधाकराला दारू पिण्यासाठी आग्रह करावाच लागत नाही. भगीरथाला मात्र समजावून सांगावे लागते. सुधाकर आपणहून दारूच्या आहारी जातो. दारूचे व्यसन फार वाईट, एकदा लागले म्हणजे सुटणे फार कठीण, सर्वस्वाचाच ते अंत करते, असे ज्या नाटकाचे प्रतिपादन त्या नाटकात भगीरथाची दारू सुटते व तीही रामलालच्या एका व्याख्यानाने. सिंधूची दशा पाहिल्यावर कुणीही न सांगता सुधाकर स्वतःच तीव्र पश्चातापाने दारू सोडतो. सुधाकराने दारूचा प्याला जो पुन्हा ओठाला लावला तो पिण्याचा मोह होतो म्हणून नव्हे तर दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची इच्छा नाही म्हणून. असे हे नाटक आहे.
  या नाटकात आपण दारू पितो, त्यापायी आपला संसार उद्ध्वस्त झाला, इतरांचाही संसार त्यामुळेच उद्ध्वस्त होतो आहे याबद्दल क्षणभरही खंत न बाळगणारा तळीराम आहे. हे नाटक दारूविरोधी नाटक म्हणून पाहण्यात अर्थ नाही; पण असे नकारात्मक विधान खरे ठरले तरी ही उच्च दर्जाची शोकात्मिका आहे याचा हे विधान पुरावा होऊ शकत नाही. गडकऱ्यांनी या नाटकात अपमानित सुधाकराच्या मनातील असह्य क्षोभाचे तपशीलवार चित्रण केलेले नाही. सिंधूने या आपत्तीत हसतमुखाने नवऱ्याला साथ दिली असे म्हटले तरी तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागच्या व्यथेचा आलेख नाटकात कुठेही आलेला नाही. श्रेष्ठ शोकात्मिकेत मध्यवर्ती पात्रांची मानसिक आंदोलने सर्व गुंतागुंतीनिशी, सर्व मानवी गुणदोषांनिशी अभिव्यक्त झाली पाहिजेत. गडकऱ्यांच्या नाटकाचे

नाटककार गडकरी : एक आकलन / ८५