पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुप्रासाचे साधर्म्य-वैधर्म्य हुडकू लागले. फुलपाखराप्रमाणे ज्याचे मन इकडून' तिकडे जगभर साधर्म्य-वैधर्म्य पकडीत भिरभिरते आहे, त्याच्या विनोदात केवढे वैचित्र्य असायला हवे. पण हे वैचित्र्य आणि विविधता गडकऱ्यांच्या नाटकात नाही. म्हणून तर त्यांच्या विनोदात सूक्ष्मता आणि मार्मिकता याऐवजी अतिशयोक्तीचे अधिराज्य आहे. साधर्म्य-वैधर्म्य धुंडाळण्याच्या प्रयत्नात गडकऱ्यांचा बाळकराम फिरत फिरत जीवनाच्या कारुण्यमय स्तरापर्यंत येऊन पोचतो. कोटिपटू आणि प्रासछांदिष्ट गोविंदाग्रज वृत्तींना उदास करणाऱ्या प्रेमभंगाच्या तीराशी येऊन तळमळू लागतो आणि नाटककार गडकरी क्रमाने मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत पोचू लागतो. गडकरी जसजसे परिपक्व होऊ लागले तसतसे व्यथेच्या जवळ पोचले. कोल्हटकरांच्या पकडीतून ते मुक्त होत होते व या प्रक्रियेत त्यांना त्यांचे स्वत्व गवसत होते. त्यांच्या प्रतिभेचे आंतरिक सामर्थ्य हळूहळू प्रकट होत होते. व्यथा, वेदना, निराशा, भीषणता व मानवी जीवनाची थक्क करणारी क्षुद्रता किंवा अपूर्णता यात समरस होणे हीच त्यांची प्रकृती होती. म्हणूनच त्यांची सुखान्त नाटकेसुद्धा दुःखाने काठोकाठ भरलेली आहेत. चार दशकांच्या अलौकिक यशाचे कारण आपण जे नाही आहोत ते होण्याच्या प्रयत्नात आलेले स्वाभाविक अपयश हे नसून क्रमाने आपले स्वत्व त्यांना गवसत गेले व त्याचाच प्रत्यय प्रेक्षकांना येत गेला हे आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा उलगडा त्याच्या प्रवासाचा आरंभ कुठून झाला इथून पाहावयाचा नसतो तर त्याच्या प्रवासाची परिणती कुठे झाली हे पाहून करावयाचा असतो, असे मला वाटते.

शोकात्मिका-क्षीरसागर
  श्री. के. क्षीरसागरांनी गडकऱ्यांच्या 'एकच प्याला' या नाटकाचा विचार शोकात्मिका म्हणून केला आहे. या भूमिकेवर वाळिंब्यांनी कठोर टीका केली; पण नंतरच्या दहा- अकरा वर्षांत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला आहे. शोकात्मिका म्हणून जर या नाटकाकडे पाहावयाचे तर हे दारूविरोधी नाटक आहे ही कल्पना प्रथम सोडून द्यावी लागते. स्वतः गडकऱ्यांची कल्पना आपण दारूविरोधी नाटक लिहीत आहोत अशीच होती. दारूचे व्यसन एकदा जडल्यानंतर ते सुटणे फार कठीण. म्हणून दारू सुटण्याचा समय एकच, तो

८४/ रंगविमर्श