पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेलोड्रामाच्या चौकटीत न मावणारी ही पात्रे आहेत.

खलनायक
  गडकऱ्यांचे नुसते खलनायक घेतले तरी ते किती चमत्कारिक आहेत. हेही आपल्या लक्षात येऊ शकते. लतिकेचा सूड घेताना मालती निष्कारण भरडली जाईल याची खंत घनःश्यामला वाटते. या खलनायकांच्या तोंडी असलेली भीषण प्रतिमाने भडक म्हणा अगर अनावश्यक म्हणा पण ती फार्सचा भाग बनू शकत नाहीत. कमलाकर म्हणतो, “चालून चालून थकलेला सूर्य उरी फुटला आहे, रक्ताची गुळणी टाकून पश्चिम क्षितिजावर मरून पडला आहे, सायंवारा अंधाराचा शेणकाला या दृश्यावरून फिरवीत आहे. दक्षिणेला उगवलेला अगस्तीचा तारा प्रेताच्या उशाशी ठेवलेल्या समईप्रमाणे तेवत आहे. किती रमणीय संध्याकाळ ही !" याच कमलाकरच्या मनात द्रुमनच्या लटकणाऱ्या प्रेताकडे पाहून, फासाने काळवंडलेल्या तिच्या निर्जीव ओठांचे एकवार चुंबन घेण्याची इच्छा होते. ही व अशी स्थळे अतिरंजित म्हटली तरी एक सत्य शिल्लक राहते. गडकऱ्यांना व्यथेची, भीषणतेची आसक्ती होती. त्यांच्या अनिवार उद्दाम कल्पकतेला एकापेक्षा एक तरल, नाजुक भावमधुर चित्रे पाहण्याची ओढ होती. मानवी जीवनातील अतळ अपूर्णता हा त्यांच्या अवलोकनाचा विषय होता. 'पुण्यप्रभावा'त एका ठिकाणी वसुंधरा व भूपाल चांदण्या पाहत बसले आहेत असा प्रसंग आहे. त्या ठिकाणचे भूपालच्या मनात तरळणारे विचार मुळातून पाहण्यासारखे आहेत. या प्रकारचे संवाद सर्वत्र आहेत. या संवादांना व्याख्याने म्हणून त्यांची हेटाळणी केली तरी ते फार्सचा अगर प्रहसनाचा भाग होऊ शकत नाहीत हे सत्य आहे.

गडकयांना जमणाऱ्या गोष्टी
  गडकऱ्यांच्या प्रतिभेची प्रकृती तपासताना त्यांना काय जमते व काय जमत नाही हे पाहिले पाहिजे. तरल, नाजूक कल्पनाचित्रे, भव्यभीषण प्रतिमा, उत्कट वेदना अगर सुन्न करणारी विफलता, मर्मभेदक तुच्छता अगर आत्यंतिकाची सर्वनाशकारक मार्गाकडे जाण्याची ओढ यांच्या चित्रणाला गडकरी अपुरे पडत नाहीत. हे सारे एका वाङ्मयकृतीत सुबकपणे व संयमाने बसविण्याला ते अपुरे पडतात. कोल्हटकरांचे अनुकरण म्हणून गडकरी कोट्या करू लागले.

नाटककार गडकरी : एक आकलन / ८३