पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण का होतात याचे वेड त्यांना कधीच लागले नाही. यामुळे त्यांच्या लिखाणाला तुकतुकीत दिखाऊपणा आला, पण जिवंतपणाची खोली मात्र प्राप्त झाली नाही. प्रेक्षकांना स्तिमित करावयाचे, त्यांना दिपवून टाकावयाचे हाच प्रयत्न गडकरी करीत असत. गडकऱ्यांच्या नाटककार म्हणून असणाऱ्या यशाचे बहुतांशी श्रेय त्यांच्या विनोदाला आहे. म्हणून विनोदी लेखक हेच त्यांचे खरे स्वरूप आहे. त्यांची प्रकृती प्रमेयात्मक गंभीर नाट्यनिर्मितीला अनुकूल नव्हती, तर उत्कृष्ट प्रहसनांच्या निर्मितीला ती अनुकूल होती. आपल्या प्रतिभेच्या या आंतरिक शक्तीची जाणीव त्यांना नीटशी झालेली नव्हती. ती जर झाली असती. तर मराठीत उत्कृष्ट प्रहसनांची निर्मिती झाली असती म्हणूनच गडकऱ्यांनी प्रथम 'वेड्यांचा बाजार' हे प्रहसन लिहिले याला फार महत्त्व आहे.

हा मेलोड्रामा वा फार्स नव्हे
  वा. लं. ची ही भूमिका खोटी, दांभिक नाही. गडकऱ्यांना महान नाटककार म्हणावयाचे व यानंतर मात्र फक्त त्यांच्या दोषांची यादीच तेवढी द्यायची, असली तडजोड या विवेचनात नाही. चाळीस वर्षांचे प्रायोगिक यश, लाखो प्रेक्षकांचा कौल, इत्यादींचे दडपण सत्याचा शोध घेण्यास निघालेल्या वा. लं.वर पडत नाही, यातच या विवेचनाचे महत्त्व व माहात्म्य आहे. दुर्दैवाने या विवेचनाशी सहमत व्हावे असा पुरावा मला गडकऱ्यांच्या नाटकात उपलब्ध झाला नाही. जर गडकऱ्यांनी दुःखी स्त्रियांच्या दुःखाचे कारण वैधव्य दाखवून, रूढींना शिव्या देत त्यांना सद्गुणी प्रियकरांच्या कुशीत नेऊन सोडले असते व सुखी केले असते तर त्यांना जीवनाचा शोध घेणे जमत नाही असा मीही गडकऱ्यांवर आरोप केला असता. खाडिलकरांच्या नाटकात ज्याप्रमाणे नायकनायिकांचे प्रेम जुळते, मतभेद येतात व शेवटी सारे संपून जिकडे-तिकडे राजाराम होते तसा प्रकार गडकऱ्यांच्या नाटकांत होत नाही. गडकऱ्यांची इच्छा असो वा नसो त्यांच्या हातून मानवी जीवनाच्या अपूर्णतेवरच नीट बोट ठेवले जाते. जयंत व लीलेच्या मीलनाआड 'मानापमान' नाटकातील धैर्यधराप्रमाणे संपत्तीचा मद येत नाही. तरुणपणी एकदाही ज्याचे दर्शन घडले नाही अशा पतीच्या बालमूर्तीचे चिंतन करणारी सुशीला सरळ आहे. वैधव्यसदृश अवस्था तिला जाळीत नाही. शरीराची भूक पतीचिंतनाच्या आड येत नाही. विद्याधर जरी न भेटता तरी

रं....६
नाटककार गडकरी : एक आकलन / ८१